#KolhapurFlood शिरोळ तालुक्यातील 55 पैकी 43 गावे झाली बेट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

शिरोळ - शिरोळ तालुक्‍यात आलेल्या महापुराने, यापुर्वीच्या महापुराचे रेकॉर्ड ब्रेक केल्याने तालुक्‍यातील 55 पैकी 43 गावाना पुराचा फटका बसला आहे. महापुरामुळे कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम शिरोळ येथे झाल्याने, शिरोळचा दक्षिणेकडील गावाशी असलेला संपर्क तुटला आहे. सुमारे सत्तर हजार नागरींकानी स्थलांतर केले आहे.

शिरोळ - शिरोळ तालुक्‍यात आलेल्या महापुराने, यापुर्वीच्या महापुराचे रेकॉर्ड ब्रेक केल्याने तालुक्‍यातील 55 पैकी 43 गावाना पुराचा फटका बसला आहे. महापुरामुळे कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम शिरोळ येथे झाल्याने, शिरोळचा दक्षिणेकडील गावाशी असलेला संपर्क तुटला आहे. सुमारे सत्तर हजार नागरींकानी स्थलांतर केले आहे.

महापुराची भीषणता ओळखून एनडीआरएफच्या जादा तुकडया आज दाखल झाल्या आहेत. तुकडयानी राजापुर, खिद्रापुर, राजापुरवाडी, कुरुंदवाड, बस्तवाड, कनवाड, कुटवाड येथे रेस्क्‍यु ऑपरेशन सुरु केले आहे. बुधवारची पहाट शिरोळ तालुक्‍यातील पुरग्रस्ताचा काळजाचा ठोका वाढविणारी ठरली. कृष्णा व पंचगंगा नदीचा संगमाचे ठिकाण नृसिंहवाडी येथे असलेतरी, कृष्णेच्या पातळीत प्रंचड वाढ झालेने शिरोळ ते नृसिंहवाडी रस्तयावर पाणी आलेने प्रशासना बरोबरच नागरीकांना धक्‍का बसला.

नृसिंहवाडीतील नव्वद टक्‍के नागरीकांनी स्थालांतर केले. कृष्णा व पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे, शिरोळातील सुमारे एकशे पन्नास घरातपुराचे पाणी शिरले. 

आमदार उल्हास पाटील, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार गजानन गुरव, पी. जी. पाटील यांनी पुराची गंभीरता ओळखून, एनडीआरएफच्या चार जादा तुकडयाना प्राचारण केले. या तुकडयापैकी तीन तुकडयांना राजापुर, खिद्रापुर, राजापुरवाडी, कुरुंदवाड, बस्तवाड या गावातील रेस्क्‍यु ऑपरेशनाकरीता पाठविले. शिरोळ नृसिंहवाडी रस्ता पाण्याखाली गेल्याने, प्रशासनावर रेस्क्‍यु ऑपरेशन कराताना कसरत करावी लागणार आहे. 

बुधवारी दुपारी चारनंतर पावसाची संततधार सुरू झाल्याने तालुक्‍यातील जनता भयभीत झाली आहे. स्थलांरित नागरिकापैकी अनेकांनी मित्रमंडळी व नातेवाईकांचा आधारा घेतला असजा तरी सेवाभावी 77 छावण्यात पुरग्रस्ताची सोय करण्यात आली आहे. शिरोळ येथील तीन ठिकाणी असलेल्या छावणीत एक हजार पाचशे पूरग्रस्त सहभागी झाले आहेत. 

वीस गावांतील वीज खंडित 
महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये पाणी शिरल्याने तालुक्‍यातील वीस गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे या गावात जनावरांसाठी व प्रापंचिक साहित्याची राखणदारी राहिलेल्या नागरिकांचा संर्पक तुटला आहे. प्रशासनास, या गावात असलेल्या तलाठी व ग्रामसेवकांशी संपर्क साधण्यात अडथळा निर्माण झाला आहे. 

49 गावांत पाणी नाही 
तालुक्‍यात कार्यरत नळपाणी पुरवठा योजेनेचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने, 49 गावातील नागरिकांना पिण्यासाठी पुराचे पाणी वापरावे लागत असल्याने, साथीचे आजार बळविण्याची शक्‍यता आहे. 

जनावरांचे बेहाल 
तालुक्‍यातील पूरग्रस्त गावातील बहुतांश भाग पाण्याखाली गेल्याने, चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. पशुधन जपण्याकरीता ग्रामिण भागातील शेतकरी परस्परांना सध्यातरी सहकार्य करीत असले तरी, आणखी चार दिवस पुराची परीस्थिती जैसे थे राहाणार असल्याने, जनावरांचे हाल होणार आहे. 

माणसांबरोबर जनावरांनाही आसरा 
शिरोळकरांची नेहमीच मदतीचा हात देण्याची परंपरा आहे. सर्वसामन्य पूरग्रस्तांना आश्रयाचे हक्‍काचे ठिकाण शिरोळ आहे. येथील सर्वपक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्ते राजकीय मतभेद बाजूला ठेवून, पूरग्रस्ताना सेवा पुरवित आहेत. शिरोळमध्ये आलेल्या पूरग्रस्तांच्या जनावरांना जागा देऊन माणुसकी जपली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood 43 villages in Shirol Taluka under water