जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पाणी घुसलेल्या नागरी वस्तीत कोलमडलेले संसार पाहून नागरिक हबकून गेले आहेत. संसार सावरण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे. अशा भागांत महापालिकेने युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. पुराचे पाणी घुसल्याने अनेक प्रांपचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घरातून बाहेर काढलेले साहित्य रस्त्यावरच ठेवण्यात आले आहे. या साहित्याकडे बघितल्यानंतरच पुराची भयानकता स्पष्ट होते.

कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागांत स्वच्छता; शिरोळला वेढा कायम
कोल्हापूर - शहरासह जिल्ह्याला गेल्या सात दिवसांपासून पडलेला पुराचा विळखा हळूहळू सैल होतानाच जिल्ह्यातील जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. शिरोळ तालुक्‍याला मात्र पडलेला पुराचा वेढा कायम असून, आज या परिसरात रस्ते सुरू झाल्याने हवाईमार्गे सुरू असलेली मदत बंद करण्यात आली.

पाणी घुसलेल्या नागरी वस्तीत कोलमडलेले संसार पाहून नागरिक हबकून गेले आहेत. संसार सावरण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे. अशा भागांत महापालिकेने युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. पुराचे पाणी घुसल्याने अनेक प्रांपचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घरातून बाहेर काढलेले साहित्य रस्त्यावरच ठेवण्यात आले आहे. या साहित्याकडे बघितल्यानंतरच पुराची भयानकता स्पष्ट होते.

शहरात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह आवश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत झाला आणि गेले तीन दिवस लागलेल्या रांगा कमी झाल्या. पुरामुळे नुकसान झालेल्या लोकांना प्रतिकुटुंब आजपासून पाच हजारांची रोख मदतवाटप करण्याचे काम सुरू करण्यात आले. पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी आज सुरू झाली. कोल्हापूरहून राधानगरीकडे जाणारी वाहतूक शेळेवाडी, मुदाळतिट्टामार्गे सुरू आहे.

गगनबावडा मार्ग अजूनही बंद आहे. कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील वाहतूकही केर्लीजवळ अजून रस्त्यावर पाणी असल्याने बंद आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणांतील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी, पंचगंगेची पातळी संथ गतीने कमी होत आहे. काल सायंकाळी सहा वाजता 47.1 फुटांवर असलेली ही पातळी आज 44.7 फुटांपर्यंत खाली आली. चोवीस तासांत पंचगंगेची पातळी अडीच फुटांनी कमी झाली असली तरी, अजूनही नदी धोक्‍याच्या पातळीवरूनच वाहते आहे.

कोल्हापुरात...
321 पुराचा तडाखा बसलेली गावे
81 हजार कुटुंबे
3 लाख 36 हजार लोकांचे स्थलांतर
210 पूरग्रस्तांच्या छावण्या
73 हजार छावण्यांतील लोक

सांगली-कोल्हापूर वाहतूक सुरू
कोल्हापूरहून पुणे, मुंबईसह राधानगरी, गगनबावडा, गोवा, सांगली, मिरज, पंढरपूर मार्गांवरील एसटी वाहतूकही आज सुरू झाली. दुपारी एकच्या दरम्यान या रस्त्यावर वाहनांची एकच गर्दी होती. त्यामुळे काही ठिकाणी कोंडी झाल्याचेही चित्र होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood Less Family Life