15 हजार जण अद्याप पुरातच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

येण्यास नकार देणाऱ्यांचे व्हिडिओ
प्रशासनाने मदतीसाठी आलेल्या पथकांना त्या-त्या गावातील नागरिकांना बाहेर काढण्याची जबाबदारी दिली आहे; मात्र जे नागरिक प्रतिसादच देत नाहीत, त्या नागरिकांबाबत पथकातील जवानांनी व्हिडिओ करण्यास सुरवात केली आहे. यातील अनेक व्हिडिओंमध्ये ग्रामस्थांनी आम्ही आहे त्या स्थितीत येथेच राहणार असल्याचे सांगितल्याचे दिसते.

शिरोळ - तालुक्‍यात पुराने वेढलेल्या गावांत अद्याप 15 हजार नागरिक असल्याची कबुली आज प्रशासनाने दिली. गेली दोन-तीन दिवस 8 ते 10 हजार नागरिक असल्याची माहिती प्रशासन देत होते. आज मात्र लोकप्रतिनिधींनी याबाबत विचारल्यानंतर प्रशासनाने 41 गावांत अद्याप 15 हजार नागरिक असल्याचे सांगितले.

दरम्यान, जे नागरिक बोटीद्वारे येणार आहेत, त्यांना उद्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अनेक गावांत पूरग्रस्तांच्या सुटकेसाठी बोटी जातात व रिकाम्याच परत येत आहेत. त्यामुळे आज प्रशासनाने सर्वच गावांतील ग्रामस्थांना उद्या संध्याकाळपर्यंत डेडलाइन दिली आहे.

तालुका प्रशासनाने पुराच्या पाण्याची पातळी वाढताना सर्वच गावांतील तलाठी व ग्रामपंचायतींद्वारे ग्रामस्थांना गावातून बाहेर पडण्यासाठी सूचना दिल्या होत्या. अनेक वेळा याबाबत नोटीसही काढण्यात आली. प्रशासनाच्या या आवाहनानंतरही मोठ्या प्रमाणात रस्ता असतानाच नागरिक गावाबाहेर पडले; मात्र पूर किती दिवस राहणार आहे, अशाच विचाराने अनेक नागरिक गावातच राहिले. दोन- तीन दिवसांपूर्वी 2005 पेक्षा पाण्याची पातळी कितीतरी पटीने वाढली आणि नागरिक भयभीत झाले. अशांची सुटका एनडीआरएफ, लष्कर यासह अन्य पथकांनी राबविलेल्या मोहिमेतून करण्यात आली. एका बाजूला बोटी येत नसल्याची तक्रार होत असली तरी दुसऱ्या बाजूला बोटी गेल्यानंतर त्यातून परत येण्यास अनेक ग्रामस्थांनी नकार दिला. त्यामुळे अनेक प्रयत्नांनंतर गावात पोचूनही या बोटी रिकाम्याच परत आणाव्या लागल्या. त्यामुळे आता जे नागरिक अद्याप पुराच्या पाण्यात आहेत त्यांना उद्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood Water 15000 People in Flood Shirol Tahsil