#KolhapurFlood आख्खे आरे गाव रात्रीत बुडाले

#KolhapurFlood आख्खे आरे गाव रात्रीत बुडाले

सडोली खालसा - आरे (ता. करवीर) येथील ग्रामस्थांना कालची रात्र काळरात्रच ठरली. आख्खा गावच स्थलांतर करण्याची परिस्थिती गावाने पहिल्यांदाच अनुभवली. कुणाचं घरं पडलं, कुणाचं धान्य वाहून गेलं, कुणाचं जळण, सारा संसार पाण्यात बुडाला. अनेकांचे डोळे पाणावले, चोहोबाजूंनी आभाळ कोसळल्याने कुठूनही मदत मिळण्याची शक्‍यता नव्हती. 

सोमवारी पाण्याची पातळी कमी होती, जसजशी रात्र होऊ लागली तसतसे पूर्वेकडील वाहणारी भोगावती व पश्‍चिमेकडून वाहणारी तुळशी या दोन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केलं. अतिवृष्टी व धरणातून सोडलेले पाणी यांमुळे पातळी झपाट्याने वाढू लागली. 

विजेअभावी अंधार, त्यात पुराचा वेढा घट्ट झालेला. 
बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता. त्यावरही रात्री नऊच्या सुमारास अडीच फूट पाणी... बाहेर पडण्यासाठी लहान, थोर अाबालवृद्धांची पळापळ सुरू झाली. पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने गावातील धाडसी युवकांनी ६ ट्रॅक्‍टर ट्रॉलीच्या संसारोपयोगी साहित्यानिशी नागरिकांना बाहेर काढले. पैपाहुणे, नातेवाईक, प्राथमिक शाळा, धनगरवाडा या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. 

जनावरे बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. जवळपास दोनशे मीटर पाणी असल्याने रस्सी बांधून तिचा आधार घेत होते. रात्रभर अंधारामध्ये एकमेकांना आधार देत पहाटेपर्यंत सर्वांना बाहेर काढण्यात आले. 

रस्ते, गल्लीबोळ पाण्याने भरून वाहत होते. संसारोपयोगी साहित्य वाहून जाताना पाहत राहण्याशिवाय काहीच करता आले नाही. त्यामुळे आरेच्या गावकऱ्यांसाठी सोमवारची रात्र काळरात्रच ठरली. ग्रामसेवक दीपा यादव व तलाठी नरेंद्र झुंबड यांनी रात्रभर सहकार्य करून ट्रॅक्‍टर-ट्रॉली चालकांना घेऊन नागरिकांचे स्थलांतर करताना तत्परता दाखविली. 

ग्रामस्थ आसऱ्याला
महापुराच्या विळख्यात सापडलेल्या आरे (ता. करवीर) गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. तिसऱ्या दिवशी पुराचा विळखा घट्ट झाल्याने संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली आहे. आख्खा गाव स्थलांतर करण्याची ही पहिलीच वेळ असून पूरग्रस्तांनी प्राथमिक शाळा, सामाजिक मंदिरे व नातेवाइकांकडे आसरा घेतला. जनावरांचा चारा आणि पूरग्रस्तांच्या जीवनावश्‍यक वस्तूचा पुरवठा येथील उपसरपंच अमर वरुटे, तलाठी, नरेंद्र झुंबड, ग्रामसेविका दीपा यादव, मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत. अनेक दानशूर मंडळी आपआपल्या परीने सहकार्य करत आहे. गावामध्ये अद्यापही पाच ते सहा फूट पाणी आहे.

स्थलांतर करताना वृद्धेचा मृत्यू 
आरे (ता. करवीर) येथील श्रीमती गंगूबाई शामराव सोरटे (वय ८०) या वृद्धेचा धनगरवाडा येथे स्थलांतर करत असताना मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास पाण्यातून नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे मुलगा, सून-नातवंडे असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com