#KolhapurFlood घरात, दुकानात, अन डोळ्यातही पाणी 

#KolhapurFlood घरात, दुकानात, अन डोळ्यातही पाणी 

कोल्हापूर - सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शाहूपूरी, लक्ष्मीपुरी परिसरातील नागरिकांची पुन्हा पाचावर धारण बसली. पाण्याचा वेग पुन्हा वाढल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले. 
गेल्या तीन दिवसापासून व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, शाहूपूरी परिसर पाण्याखाली आहे. आज सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर पाणी उतरेल याची आशा होती. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पावसाची जोरात सर आली आणि पाणी कमी होण्यापेक्षा पातळीत वाढ झाली. दुपारनंतर लोक पाणी कमी होईल या आशेवर होते. पूर पाहणारे मोबाईलवर फोटो काढण्यात मग्न होते. मात्र पूरग्रस्तांची अवस्था अतिशय वाईट होती. बंद दुकानांकडे पाहत पाण्याच्या वाढत्या पातळीचा लोक अंदाज घेत होते. परिस्थितीत थोडी सुधारणा होईल असे वाटत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धुवॉधार पावसास सुरवात झाली आणि लोकांच्या तोंडचे पाणी पळाले.

एकीकडे दिवस मावळत असताना दूसऱ्या बाजूला धडकी भरविणारा पाऊस पडत होता. व्हीनस कॉर्नर ते दसरा चौक, टायटन शो रूम ते फोर्ड कॉर्नर, सुभाष रोड रस्त्यावरील लगतची गल्ली, कोंडाओळ परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. 

1989, 2005 ला इतके पाणी आले नव्हते. पुराचे पाणी म्हणायचे की काय अशीच चर्चा परिसरात होती. पाण्याचा वाढता वेग आणि त्यामुळे मागे सरकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. लोक घरे दारे सोडून पै पाहुण्यांच्या आसऱ्याला जाऊन बसले आहेत. शाहूपूरी. लक्ष्मीपुरी. व्हीनस कॉर्नर,शाहूपूरी तसा व्यापारी आणि दुकानदारांचा परिसर, मोबाईल विक्रीपासून गाड्यांचे नंबर प्लेट, ते मेस्त्री कामापर्यंत हाताच्या पोटावर असलेला हा भाग.

एक दोन दिवस पाण्याने वेढा दिला तर दरवर्षी पाणी येणार अशी मानसिकता सर्वाचीच असते. गणेशोत्सव तोंडावर आल्याने गणेश मूूर्तीसाठी गेल्या महिन्यापासून लगबग सुरू होते. पूराच्या पाण्यामुळे मूर्ती अन्यत्र स्थलांतरित झाल्या आहेत. घरगुती पूजेच्या मूर्ती बनविण्याचे काम ठप्प झाले आहे. शाहूपूरीच्या कोपऱ्याला दुचाकी दोन चार मेस्त्री नजरेस पडायचे या मेस्त्री मंडळीच्या पोटावर पाय आले आहेत. दुचाकी नादुरूस्त झाली की शाहूपूरी हे स्पेअर पार्ट मिळण्याचे हक्काचे ठिकाण, गाडीवर आकर्षक नंबर प्लेट हवी असेल तर याच भागाचा आधार.

जनावरांच्या खाद्यासाठी गवत मंडई तर हक्काचे ठिकाण पाण्यामुळे गवत मंडई रस्त्यावर आली आहे. एका पेंढीचा दर पन्नास रूपयांवर पोहचला आहे. प्रमूख बॅंका, एटीएम सेंटर यामुळे दररोजची उलाढाल कोटीच्या घरात आहे. नेहमी वाहनांची वर्दल असलेला हा भाग सुनासुना झाला आहे. 

खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद असल्याने या मंडळीचेही घर चालणे मुश्‍कील झाले आहे. लोक ज्या भागात स्थलांतरित झाले आहेत तेथे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे पण बुडलेली घरेदारे आणि दुकाने पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी भरण्याची वेळ आली आहे. पाणी कधी ओसरणार आणि व्यवहार कधी सुरळीत होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. जयंती नाल्याच्या पाण्याच्या रौद रूपाचा अनुभव शाहूपूरी. लक्ष्मीपुरीवासिय घेऊ लागले आहेत. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com