कोल्हापूरचा चोहोबाजूंनी संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

सलग सहा दिवसाच्या अतिवृष्टीनंतर कोल्हापूरचा संपर्क चोहोबाजूने तुटला आहे. इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्ग 4 पुणे बेंगलोर येथे पाणी आल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  यामुळे पुण्याहून आलेले प्रवासी पेठ नाका ते किनी वाटार आणि बेळगाव बंगळूर या कर्नाटक भागातून आलेले प्रवासी कागल परिसरात थांबून ठेवण्यात आले आहेत.

कोल्हापूर - सलग सहा दिवसाच्या अतिवृष्टीनंतर कोल्हापूरचा संपर्क चोहोबाजूने तुटला आहे. इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्ग 4 पुणे बेंगलोर येथे पाणी आल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  यामुळे पुण्याहून आलेले प्रवासी पेठ नाका ते किनी वाटार आणि बेळगाव बंगळूर या कर्नाटक भागातून आलेले प्रवासी कागल परिसरात थांबून ठेवण्यात आले आहेत. याच मार्गावरून पुढे तवंदी घाटातून कोकणाकडे जाणारा रस्ताही बंद झाला आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गावरून कोकणात जाणारा संपर्कही तुटला आहे. यामुळे 2005 पेक्षा या महापुराची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येते.

कोल्हापुरातून कोकणात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी महापुराचे पाणी आले आहेत तर काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे हे मार्ग बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. आंबा कोल्हापूर मार्गावर ठीक ठिकाणी पाणी असून कोल्हापूर पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेवाडी जवळ तीन दिवसापूर्वी रेडे डोह फुटल्यामुळे तिथेही रस्त्यावर पाणी आहे. आंबेवाडी, चिखली परिसरात पाणी घुसल्यामुळे येथील कुटुंबे स्थलांतरित करण्यात आले आहे त. तसेच या परिसरातील ग्रामीण भागात सुद्धा पाणी आल्यामुळे कोकणाकडे जाणारा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

गगनबावडा मार्गे कोकणात जाणारा रस्ता भूस्खलन झाल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या परिसरातील पर्यायी मार्गही धोकादायक  असल्यामुळे तेही बंद करण्यात आले आहेत. अशीच काहीशी स्थितीसुद्धा पन्हाळा गारगोटी भागात  आहे. गारगोटी मार्गे कोकणात जाणारा रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी कोल्हापूरचा चोहोबाजूने संपर्क तुटला आहे इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर चोहोबाजूनी वाहतूक मार्गासाठी तुटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood Water Panchganga River Rain Contact Break