#KolhapurFloods नृसिंहवाडीतील 70 पुजारी पुरात अडकले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

इचलकरंजी - नृसिंहवाडी येथील दत्त देवस्थानच्या सेवेसाठी थांबलेले 70 पुजारी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या असून यांत्रिकी बोटी अभावी दुपारपर्यंत हे सर्वजण पाण्यातच अडकून आहेत.

इचलकरंजी - नृसिंहवाडी येथील दत्त देवस्थानच्या सेवेसाठी थांबलेले 70 पुजारी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या असून यांत्रिकी बोटी अभावी दुपारपर्यंत हे सर्वजण पाण्यातच अडकून आहेत.

नृसिंहवाडीला दोन दिवसापूर्वीच पुराच्या पाण्याने वेढले आहे. केवळ शिरोळ-नृसिंहवाडी हाच मार्ग दोन दिवसापूर्वी खुला होता. अख्खे गाव यापूर्वीच स्थलांतरीत झाले आहे. मात्र तेथील देवस्थानच्या सेवेसाठी 70 पुजारी त्याच ठिकाणी थांबले. गेले दोन दिवस त्यांच्यापर्यंत मदत पोचविणे शक्य झाले. मात्र कालपासून पाण्याचा प्रचंड वेग आणि शिरोळ-नृसिंहवाडी रस्ताही बंद असल्याने त्यांच्या पर्यंत अन्य मदत पोचविणे मुश्किल झाले. आज सकाळ पासूनच त्या ठिकाणची सर्व पुजारी आपली सुटका करावी यासाठी प्रशासनाकडे मागणी करत आहेत. मात्र एनडीआरएफच्या यांत्रिकी बोटीशिवाय त्या ठिकाणी पोचणे शक्य नाही. ती बोट सध्या उपलब्धच नसल्यामुळे सर्व 70 पुजारी त्याच ठिकाणी अडकले आहेत.

तालुका प्रशासन त्यांची सुटका करण्यासाठी यांत्रिक बोट उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
प्रशासनाने यापूर्वीच या सर्वांना एकूण परिस्थिती पाहता बाहेर येण्यासाठी आवाहन केले होते. मात्र ते तेथेच थांबून राहिल्याने सध्या त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

दृष्टीक्षेपात शिरोळ तालुक्याची स्थिती
* एकूण पूरबाधीत गावे- 43
* स्थलांतरीत झालेले नागरिक- 70 हजार
* एनडीआरएफच्या तुकड्या- 9
* बेटाचे स्वरूप आलेली गावे- 23
* बंद असलेले मार्ग- 36


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods 70 priests from Narsinghwadi live in flood