#KolhapurFloods बारिशने हमारा बच्चाभी छिना...

#KolhapurFloods बारिशने हमारा बच्चाभी छिना...

कोल्हापूर - ‘‘जोर की बारिश रुकने का नाम नही ले रही थी, उसमें छोटा उमर भी बिमार पडा । हातोंको काम नही था, इसलिये उसे अच्छी दवा हम दे न सके । पिछले हप्ते पाणी घरमें घुसा, छोटे उमर को लेकर हम पानी में भिगते-भिगते बाहर 
आये । घर को छोडा, लगा अपनी जान तो बची, पर ऐसा नही हुआ। हमारे उमर की तबीयत बिघड गई, उसे न्यूमोनिया हो गया । उसको हमनें ‘सीपीआर’मध्ये दाखिल किया । वो अच्छा हो जायेगा, ऐसा हमारा विश्‍वास था, पर ईद के ही दिन वो हमसे बहोत दूर गया...’’ अशी करुण कहाणी सांगताना शेख दांपत्याच्या अश्रूंचा बांध फुटला.

कसबा बावडा येथील डबरा कॉलनीत सलीम शेख व मदिना शेख हे दांपत्य एका छोट्या खोलीत भाडेकरू म्हणून राहतात. ते गवंड्याच्या हाताखाली काम करतात. रोज हाताला काम मिळेल, याची त्यांना शाश्‍वती नाही. तरीही ते संसाराचा गाडा चालवत होते. पाच वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला. गोंडस बाळाचं नाव त्यांनी ‘उमर’ ठेवलं. खेळकर बाळ शेख कुटुंबासह शेजाऱ्याचं 
लाडकं बनलं. 

जुलैच्या अखेरीस धो धो पाऊस बरसू लागला. हाताला काम नसल्याने सलीम घरीच होते. पावसाचे पाणी साचू लागलं. त्यातून दुर्गंधी सुटू लागली. घरात गारठा निर्माण झाला. याचा फटका उमरला बसला. तो आजारी पडला. त्याला पावसातून आई-वडिलांनी औषधही आणलं. पण, काही फरक पडत नव्हता. मदत मागायची तर कोणाकडे? वडिलांचा तर पेंटिंग व्यवसाय. तो पावसाळ्यात थंड झाला होता. त्यामुळे उमरवर घरगुती उपचारांची जोड दिली जात होती. 

सोमवारी (ता. ५) तर कहरच झाला. कधी नव्हे ते शेख कुटुंबाच्या घरात सायंकाळी अचानक गुडघाभर पाणी शिरलं. पाहता-पाहता ते वाढू लागलं. सलीम व मदिना यांनी उमरला कडेवर घेतले. शेजाऱ्यांच्या मदतीनं त्याला बाहेर आणलं. पावसात भिजून गारठलेल्या उमरचा ताप आखणी वाढला. त्याला शेख कुटुंबीयांनी त्याच दिवशी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू झाले. पुरात अडकलेलं घर, पाण्यात गेलेल्या प्रापंचिक साहित्याचा कसलाही विचार शेख दांपत्याला नव्हता. त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त उमर होता. तो आजारातून बरा होऊ दे, यासाठी त्यांचं दुवापठण सुरू होतं. ईद जवळ आली तसा उमर चांगला होईल, असा विश्‍वास होता. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला.

कालच्या ईद दिवशी सकाळपासून उमरची प्रकृती अधिकच बिघडत गेली. अखेर रात्री ‘उमर’ शेख कुटुंबापासून दूर निघून गेला. याचा धक्का मदिना यांना बसला. त्या बेशुद्ध होऊन कोसळल्या. त्यांना सलाईन लावण्याची वेळ आली. त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या तोंडून बेटा उमर व्यतिरिक्त कोणतेच शब्द बाहेर पडत नव्हते. महापुरानं शेख कुटुंबाचा संसार तर वाहून नेला. शिवाय, त्यांचं गोंडस बाळही हिरावून घेतलं.

लाडकं बाळ!
घर स्वच्छ होईल, वाहून गेलेले साहित्य पुन्हा खरेदी करता येईल. मात्र, या पावसात आजारी पडून गल्लीतलं सर्वांचं लाडकं बाळ गेलं, अशीच चर्चा कसबा बावड्यात राहणाऱ्या शेख यांच्या शेजारा-पाजाऱ्यांत सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com