#KolhapurFloods शाहूवाडीत सात गावे संपर्काबाहेरच

राजेंद्र पाटील
रविवार, 11 ऑगस्ट 2019

अणुस्कुरा - शाहूवाडी तालुक्‍याच्या कासारी खोऱ्यातील सात गावे २७ जुलैपासून आजअखेर गेले १५ दिवस संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. अनुस्कुरा घाटानजीक असलेली ही गावे कासारी नदीला महापूर आल्याने यंदा प्रथमच दीर्घ कालावधीत संपर्क क्षेत्राबाहेर गेली आहेत.

अणुस्कुरा - शाहूवाडी तालुक्‍याच्या कासारी खोऱ्यातील सात गावे २७ जुलैपासून आजअखेर गेले १५ दिवस संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. अनुस्कुरा घाटानजीक असलेली ही गावे कासारी नदीला महापूर आल्याने यंदा प्रथमच दीर्घ कालावधीत संपर्क क्षेत्राबाहेर गेली आहेत. पाल व बर्कीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. वीज नाही, मोबाईल सेवाही बंद, दळणवळण नाही, जीवनावश्‍यक वस्तू गावात उपलब्ध नसतात. त्यामुळे या गावातील लोकांची प्रशासनाने दखल घेण्याची 
गरज आहे.

या गावातील बहुतांश लोकांचे व्यवहार करंजफेण बाजारपेठेशी होतात. रोजगार करीत हातावरचे पोट असलेले हे लोक कासारी नदीच्या पलीकडे अडकून पडले आहेत. पंधरा दिवसांत त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंचा निश्‍चित तुटवडा जाणवत आहे. आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या गावातील लोकांना जीवनावश्‍यक वस्तू पुरवठा करण्याची गरज आहे. सर्व संबंधितांनी याबाबत प्रयत्न करायला हवेत.

शाहूवाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील माळापुडेपासून अनुस्कुरा घाटापर्यंत लोकांची प्रमुख बाजारपेठ करंजफेण आहे. ही मुख्य बाजारपेठच यावर्षी पुराच्या पाण्यात अखंड बुडाली. बाजारपेठेत सुमारे ४० लोक दोन दिवस अडकून पडले होते. थोडे पाणी कमी होताच राम पाटील या तरुणाने धाडसाने आपला ट्रॅक्‍टर पाण्यात घातला. तीन इमारतींच्या दुसऱ्या मजल्यावर आश्रय घेतलेल्या लोकांना पाण्याबाहेर काढले. करंजफेण बाजारपेठेतील पाणी कमी झाले आहे. मात्र, या भागातील अनेक रस्त्यांवर पाणी असल्याने दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods seven villages in Shahuwadi taluka affected