#KolhapurFloods  डोळ्यांत पाणी; भिजलेला संसार 

सुधाकर काशीद
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - अलीकडच्या घरात पाणी, पलीकडच्या घरात पाणी. सर्वांचाच संसार चिंब भिजलेला. घरातल्या भांड्याकुंड्यांवर चिखलाचा थर चढलेला. ठेवणीतले कपडे, साड्या यांचा तर चोळामोळा झालेला. अंथरूण, पांघरूण, पहिल्या खोलीतले फर्निचर, कोपऱ्यातले कपाट पुराच्या पाण्याने फुगलेले आणि धान्याचा डबा उघडून पाहावा, तर साऱ्या धान्याला मोड आलेले. बहुतेक सगळ्यांच्या घरांत हीच परिस्थिती. 

कोल्हापूर - अलीकडच्या घरात पाणी, पलीकडच्या घरात पाणी. सर्वांचाच संसार चिंब भिजलेला. घरातल्या भांड्याकुंड्यांवर चिखलाचा थर चढलेला. ठेवणीतले कपडे, साड्या यांचा तर चोळामोळा झालेला. अंथरूण, पांघरूण, पहिल्या खोलीतले फर्निचर, कोपऱ्यातले कपाट पुराच्या पाण्याने फुगलेले आणि धान्याचा डबा उघडून पाहावा, तर साऱ्या धान्याला मोड आलेले. बहुतेक सगळ्यांच्या घरांत हीच परिस्थिती. 

अशा काळजाला चटका लावणाऱ्या वातावरणात आज पूरग्रस्तांचा नववा दिवस उजाडला. गेले आठ दिवस हे सारे दैन्य पाण्याखाली दडले होते. आज पाणी उतरल्याने ते नजरेसमोर आले आणि या परिस्थितीत आता कोणी कोणाला सावरायचे म्हणत प्रत्येकजण आपल्या घराची घडी पुन्हा बसवण्यासाठी आपापल्या परीने धडपडू लागले.

आज पुराचे पाणी बऱ्यापैकी उतरले. पाण्यात फक्त कौले दिसणाऱ्या घरांचे दरवाजे दिसू लागले. भिंती भिंतीवर पुराच्या पाण्याची पातळी दर्शवणारी थेट स्पष्ट रेषा दिसू लागली. रस्त्यावर चिखल, उग्र कुबट वास सर्वत्र पसरलेला. अशा वातावरणात एका एका घराचे कुलूप उघडले गेले. घराची अवस्था पाहून अनेकांना गहिवरून आले. लहान मुलांनी ही अवस्था पाहू नये, म्हणून अनेकांनी त्यांना नातेवाइकांच्या घरी ठेवले. मग ओले चिंब झालेले आपले घर सावरण्याचे काम ओले झालेल्या डोळ्यांनी सुरू केले. 

याही परिस्थितीत माणसाचा देवावर भरोसा; त्यामुळे काहींनी प्रथम देव्हाऱ्यातले देव, पाण्याने फुगलेले देवदेवतांचे फोटो बाहेर काढले. ते धुतले; मग घराची एक एक खोली धुण्यास सुरवात केली; पण हे धुवायलाही पाणी अपुरे. त्यामुळे घरापासून थोड्या अंतरावर पोहोचलेल्या पुराच्या पाण्यातूनच बादल्या, घमेली भरून पाणी आणावे लागले व घर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक खोलीत खराटे फिरू लागले. 

हे करताना घरातली औषधे, शिवण मशिन, रेफ्रिजरेटर, कपाटातली पुस्तके, वह्या, बॅंक, गॅस सिलिंडरची पासबुके, टीव्ही, दररोज हातात असणारा रिमोट हे सारे काही निकामी झाले असल्याचे लक्षात आले. काडी काडी करून संसार उभा करणाऱ्या भगिनींना हे पाहणे काही काळ कठीण झाले. अशा घरात अजून चार-पाच दिवस तरी गॅस शेगडी पेटवता येणार नाही. अंथरुणावर पाठ टाकता येणार नाही. हे बहुतेक ध्यानात आले आणि आणखी दोनतीन दिवस तरी निवारा केंद्रात किंवा नातेवाइकांच्या घरांत राहावे लागणार, हे स्पष्ट झाले. 

शाहूपुरी, शुक्रवार पेठेत मुस्लिम कुटुंबांची अनेक घरे. आज बकरी ईद; पण नेहमीप्रमाणे घरात कसलीही धावपळ नाही. कुर्बानी नाही. खास ईदचे वैशिष्ट्य म्हणून ओळखली जाणारी खीर शिजली नाही. सणाचा स्वयंपाक करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गॅस सिलिंडरच्या रांगेत ठळक हजेरी लागली. हे झाले घरातले वातावरण. दुकानदारांनी शटरची कुलपे जड अंतःकरणानेच काढली. शटर वर करताच जे काही दिसले, ते पाहून काहींना सुन्न व्हावे लागले. काही जणांना नुकसानीचा नेमका अंदाज घेण्यासाठी दुकानातले साहित्य उपसावे लागले. त्यांच्या मदतीसाठी त्यांचे मित्र, नातेवाईक आले.

या पुरात शहरातली महत्त्वाची दहा हॉस्पिटल- त्यांपैकी काही पूर्ण तर काही बेसमेंटपर्यंत पाण्यात गेली. या दवाखान्यांतले रुग्ण व कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थांच्या बोटीतून चारपाच दिवसांपूर्वी बाहेर काढल्याने दुर्घटना टळली; पण आता बहुतेक दवाखान्यांतले पाणी कमी झाले आणि डॉक्‍टर, परिचारिका, आया, वॉर्डबॉय सारेजण तोंडाला मास्क व हॅंडग्लोव्हज्‌ घालून दवाखाना स्वच्छ करण्याच्या कामाला लागले. एरव्ही रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या गर्दीमुळे गजबजून जाणारे हे दवाखाने आता भकास दिसत होते. बहुतेक दवाखान्यांतील जनरेटर पुराच्या पाण्यामुळे निकामी झाले आहेत. त्यामुळे दिवसभरात अनेकांनी होते तेवढे काम पूर्ण केले.

पूरग्रस्तांनी पुराचे रौद्ररूप सलग चार दिवस अनुभवले. काहींच्या वाट्याला अन्न-पाण्यावाचून राहण्याची वेळ आली; पण निवारा केंद्र, प्रशासन, महापालिका, आपत्कालीन मदत, स्वयंसेवी केंद्र, हॉटेल मालक संघ, राजकीय नेते यांनी जेवणाची व्यवस्था केली. राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. दूध, पेस्टपासून उबदार कपड्यापर्यंत सर्व सेवा दिली. इथल्या मुस्लिम समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मदरशात राहणाऱ्या पूरग्रस्तांना लिंबाची पाने घालून गरम केलेले पाणी आंघोळीला देण्याची व्यवस्था केली. या साऱ्या मदतकार्याने आपत्तीची तीव्रता जरूर थोडी कमी झाली; पण आता ओल्या चिंब झालेल्या घरांत पुन्हा नव्याने पाऊल टाकताना अनेकांची पावले नक्कीच अडखळली!

सेंट्रल किचनसाठी प्रयत्न सुरू
पुराचे, घरांभोवतालचे पाणी कमी झाले असले; तरी या घरांत तत्काळ स्वयंपाक करता येणार नाही. याचा अंदाज घेऊन हॉटेल मालक संघाने पुढचे चार दिवस आपले सेंट्रल किचन सुरू राहील, असा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कारण संपूर्ण कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या जेवणाचा भार हॉटेल मालक संघाने व विविध स्वयंसेवी संस्थांनी उचलला आहे. आता त्यांचा भार आणखीनच वाढला आहे. त्यासाठी तेही जोमाने प्रयत्न करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods special story