#KolhapurFloods कोसळलेल्या भिंतीचाच आता आडोसा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - आई दवाखान्यात ऍडमीट होती, त्याकडे आमचं सारं लक्ष होत, 3 ऑगस्टपासूनच घरापर्यंत पुराचं पाणी पोचलं. रविवारी भावाला घेऊन घरात आलो. रात्री पाणी वाढत गेलं. हाताला लागलेली चार भांडी घेऊन घर सोडलं. सात दिवस घर पाण्याखाली राहीलं. त्यात घराची भिंत पडली तर सोनारकामातील आटणीचं पाणीही वाहून गेलं.

कोल्हापूर - आई दवाखान्यात ऍडमीट होती, त्याकडे आमचं सारं लक्ष होत, 3 ऑगस्टपासूनच घरापर्यंत पुराचं पाणी पोचलं. रविवारी भावाला घेऊन घरात आलो. रात्री पाणी वाढत गेलं. हाताला लागलेली चार भांडी घेऊन घर सोडलं. सात दिवस घर पाण्याखाली राहीलं. त्यात घराची भिंत पडली तर सोनारकामातील आटणीचं पाणीही वाहून गेलं.

आई बरी झाली. तिला घरात झालेलं नुकसान सांगायचं कसं? आणि घर बांधायचं कसं.? याचीच चिंता आता लागून राहिल्याचे जिव्हाळा कॉलनीतील ऋषिकेश अशोक पाटील यांनी कहाणी सांगितली. 

जिव्हाळा कॉलनीत ऋषिकेश भाऊ युवराज आणि आई आश्‍विनी यांच्या सोबत राहतात. ते दोघे सोनारकाम करतात. त्याची आई काही दिवसापासून आजारी होती. तिला फुलेवाडीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

दैनंदिन काम, दवाखाना बघताना दोघा भावंडांची दमछाक होत होती. त्यात धो धो कोसळणारा पाऊस काही केल्या थांबवत नव्हता. त्यात आलेल्या पुराचं पाणी 3 ऑगस्टला त्यांच्या घरापर्यंत पोचलं. शेजाऱ्यांनी त्यांना फोनवरून याची माहिती दिली. ऋषिकेश भाऊ युवराजबरोबर घरी आले. पाणी दारात होतं. पण सायंकाळी पाणी घरात शिरू लागलं. त्याचा वेगही जास्त होता. त्यामुळे हाताला येईल ते साहित्य बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यात फारस यश आले नाही. अखेरीस पाणी कमरेच्या वरपर्यंत पोचल्यानंतर त्यांनी कसाबसा दरवाजा बंद केला आणि घर सोडलं. सात दिवसानंतर घरातील पाणी ओसरलं. पण त्यात घराची भिंत कोसळली होती. 

आटणीचं पाणीही वाहून गेलं 
गणेशोत्सव सणासाठी आर्थिक गरज भागावी यासाठी साठवलेलं सोनार कामातील आटणीचं पाणी होतं. चटणी मीठासह किरकोळ धान्यही या पाण्यात नष्ट झालं. घरातील सिलिंडर व शेगडीही वाहून गेली. त्याचा शोध घेऊनही ती सापडली नाही. कामासाठीचा वजनकाटा ही खराब झाला. आता सगळ कसं उभ करायचं याची चिंता पाटील कुटुंबीयांना लागून राहिली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods special story of Flood affected