#KolhapurFloods ती रात्र पुरासह भीतीचा लोट घेऊनच आली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

कोल्हापूर -  तीन लहान मुले, यातील एक पाळण्यात खेळणारं, रात्रीत पावसाचा जोर इतका वाढला आणि बाहेर कुठे निवारा शोधायचा याची चिंता सुरू असताना घर पाण्याने भरलं. बाळ उराशी कवटाळलं, दुसऱ्या बाळाला हाताशी धरलं. मोठं बाळ सोबत घेऊन अखंड रात्र रस्त्यावरच काढायची वेळ आली. ही रात्र पुरापेक्षाही भीतीचा लोट घेऊन मनात साचून राहिली आहे, असा अनुभव विश्‍वभारती कॉलनीतील सायरा अन्वर शेख यांनी व्यक्त केला. 

सायरा या लक्षतीर्थ कॉलनीतील विश्‍वभारती कॉलनीत भाड्याने राहतात. पती अन्वर गुजरीत कारागिराचे काम करतात. तुटपुंज्या पगारावर घर चालते. त्यांना दहा वर्षाच्या आतील दोन मुली व एक वर्षाचा मुलगा. आठ-नऊ वर्षांपासून ते या परिसरात राहतात. परंतु, कधी पुराचे पाणी घराच्या पायरीलाही लागले नाही. यंदा पावसाचा जोर इतका वाढला, की एका रात्रीतच घरात पुराचे पाणी शिरले. पावसामुळे लाईटही नव्हती. त्यामुळे अंधारातच वाट काढत मुलांना खांद्यावरून रस्त्यावर आणले. शेतवडीजवळ घर असल्याने सापांचा सुळसुळाट होता.

एकीकडे पावसाचे थैमान आणि दुसरीकडे सापांची भीती, यामुळे ती रात्र त्यांची परीक्षा घेणारी ठरली. त्यामुळे साहित्य हलवायलाही वेळ मिळाला नाही. सकाळी त्यांच्या नातेवाइकांनी येऊन त्यांना आधार दिला व घरी घेऊन गेले. पुराच्या पाण्याने घरातील कपडे, धान्य, पीठ, तांदूळ, तेल असे साहित्य वाहून नेले असले तरी या जीवघेण्या पुरात आमचे जीव तरी वाचले, अशी भावना सायरा यांनी व्यक्त केली.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods special story of suffers