बेरजेच्या राजकारणासाठी नेत्यांच्या जोडण्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

भाजप-शिवसेना युती विरुद्ध कॉंग्रेस, राष्ट्रवादी असेच साधारण लढतीचे स्वरूप राहणार आहे. या निमित्ताने कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेही गटबाजी बाजूला ठेवत एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कालपर्यंतचे राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आले आहेत.

कोल्हापूर - नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने केवळ त्या नगरपालिकांचे क्षेत्रच नव्हे, तर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

काल अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर राजकीय घडामोडींच्या पुढच्या टप्प्यास आता सुरवात झाली. भाजप-शिवसेना युती विरुद्ध कॉंग्रेस, राष्ट्रवादी असेच साधारण लढतीचे स्वरूप राहणार आहे. या निमित्ताने कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेही गटबाजी बाजूला ठेवत एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कालपर्यंतचे राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आले आहेत. इचलकरंजी, कागलमध्ये राजकीय धुमशान जोरात होण्याचे संकेत मिळत आहेत.

पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पन्हाळ्यात जनसुराज्यला दोन आघाड्यांशी लढत द्यावी लागणार आहे. वडगावात महाआघाडीने यादव व भाजप आघाडीला आव्हान दिले आहे. तर कुरुंदवाड, मुरगूडला पारंपरिक लढती रंगणार असल्याचे चित्र आहे. जयसिंगपुरात सत्ताधाऱ्यांसमोर कडवे आव्हान आहे, तर गडहिंग्लज पालिकेत शेवटच्या दिवशी होणाऱ्या जोडण्यांचा ड्रामा अजून बाकी आहे. अर्ज माघारीनंतर पालिकानिहाय आघाडी, युती यांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Kolhapur gets ready for elections