एकटे एकत्र आले आणि हा जथ्था निघाला...!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

गेले चार दिवस कपडे आणि इतर साहित्य आणून देणाऱ्यांची आणि त्याच्या कैक पटींनी हे साहित्य घेऊन जाणाऱ्यांची मोठी गर्दी झाली. दिवाळीनिमित्तच्या या उपक्रमाची आज सांगता झाली. मात्र, अजूनही पंचवीस हजारांहून अधिक कपडे शिल्लक राहिले आहेत. हे कपडे आता ऊसतोडणी कामगार, साखर शाळांतील मुलांना वितरित केले जाणार आहेत.

कोल्हापूर - गरजूंना मदत करून त्यांच्याही आयुष्यात आनंदाचे चांदणे पडावे, अशी अपेक्षा. पण, एकटा कुठे कुठे काय करणार? असेच सर्व एकेकटे "माणुसकीची भिंत' या व्हॉटस्‌ ऍप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले आणि आता हा मोठा जथ्था समाजातील गरजूंचे आयुष्य अधिक आनंददायी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

दिवाळीनिमित्त दसरा चौकात उभारलेल्या "माणुसकीची भिंत' उपक्रमात अडीच हजारांहून अधिक कोल्हापूरकरांनी कपडे आणि इतर साहित्य स्वतःहून आणून दिले आणि त्यामुळे हजारो गरजूंची दिवाळी आनंददायी झाली. आता हा उपक्रम गुढीपाडव्यापूर्वी चार दिवस पुन्हा राबवणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील उपस्थित होते.

दरम्यान, गेले चार दिवस कपडे आणि इतर साहित्य आणून देणाऱ्यांची आणि त्याच्या कैक पटींनी हे साहित्य घेऊन जाणाऱ्यांची मोठी गर्दी झाली. दिवाळीनिमित्तच्या या उपक्रमाची आज सांगता झाली. मात्र, अजूनही पंचवीस हजारांहून अधिक कपडे शिल्लक राहिले आहेत. हे कपडे आता ऊसतोडणी कामगार, साखर शाळांतील मुलांना वितरित केले जाणार आहेत. वर्षातून दोनदा हा उपक्रम राबवला जाणार असून मार्चमध्ये गुढीपाडव्यापूर्वी चार दिवस दसरा चौकातच हा उपक्रम पुन्हा घेतला जाणार आहे.

आमदार पाटील म्हणाले, ""सोशल मीडियावर या उपक्रमाबाबतची माहिती मिळाली आणि काही तरुणांनी हा उपक्रम कोल्हापुरातही सुरू व्हावा, अशी इच्छा व्यक्त करताच त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. गेले चार दिवस येथे साहित्य घेऊन आलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर जितके समाधान दिसले त्याच्याहीपेक्षा कैक पटीने अधिक समाधान गरजूंच्या चेहऱ्यावर दिसले. आपल्या मापाला कपडे आले नाहीत तर पुन्हा ते देऊन मापाचे कपडे नेणाऱ्या गरजूंनीही प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. काही व्यक्ती व संस्थांनी तर जुन्या कपड्यांऐवजी थेट नवे कपडे आणून दिले. गरजूंमध्ये महिला आणि मुलांसाठी कपड्यांची मागणी अधिक दिसून आली. पुढील उपक्रमात त्याबाबत योग्य ते नियोजन केले जाईल.''

दरम्यान, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, सुधर्म वाझे, प्राचार्य अजय दळवी, अमर पाटील, सूरज पाटील, प्रसाद पाटील, प्राचार्य महादेव नरके, मोहन सालपे, निनाद कामत, देवेंद्र रासकर, प्रशांत पोकळे, हृषीकेश खरटमल आदींसह शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे नेटके संयोजन केले.

Web Title: Kolhapur helps poor to celebrate