बोल अहंकारा, सदानंदाचा यळकोट...! 

बोल अहंकारा, सदानंदाचा यळकोट...! 

कोल्हापूर - प्राचीन कोल्हापूरच्या इतिहासाचा मानदंड असलेल्या शुक्रवार पेठेतील खोलखंडोबा मंदिरासह शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय, महालक्ष्मी मंदिरातील खंडोबा देवस्थान, रामानंदनगर आदी ठिकाणी चंपाषष्ठी उत्सवाला पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी (ता. 5) चंपाषष्ठीचा मुख्य दिवस असून सायंकाळी पालखी सोहळे सजणार आहेत. दरम्यान, चंपाषष्ठी उत्सवानिमित्त वाघ्या-मुरळीसह विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

मार्गशीर्षातील शुद्ध प्रतिपदेला या उत्सवास प्रारंभ होतो. सहा दिवस चालणाऱ्या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होतात. पहिल्या दिवशी खंडोबाला शेला-पगडी बांधून, तर म्हाळसाईदेवीला साडी-चोळी नेसवून त्यांची स्थापना केली जाते. त्यानंतर दररोज अभिषेक, आरती, वाघ्या-मुरळीचे कार्यक्रम, भजन असे कार्यक्रम होतात. उत्सवात जागरानंतर "यळकोट यळकोटऽऽऽ'च्या जयघोषात तळी उचलण्याचा कार्यक्रमही होईल. 

खोलखंडोबा मंदिर कोल्हापुरातील प्राचीन अवशेषाचा अस्सल पुरावा आहे. ब्रह्मपुरी टेकडी नैसर्गिक आपत्तीत गाडली गेली. जुने कोल्हापूर त्याखाली दडले गेले. त्याचे अवशेष आजही उत्खननात मिळतात. तसाच प्रकार खोलखंडोबा परिसरात आहे. अनपेक्षितपणे इथला काही भाग जमिनीपासून खोलगट भागात दडला गेला आहे. त्यापैकी खोलखंडोबा मंदिर आजही पाहता येते. पंचगंगेला महापूर आला, की या मंदिरात पाण्याचे उमाळे फुटतात व मंदिराच्या काही भागांत पाणी साठते. पूर ओसरला की हे पाणीही ओसरते. चंपाषष्ठी सोहळ्याला राज्यभरातून भाविक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. चंपाषष्ठीनिमित्त येथे रोज सायंकाळी महिला भजनी मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (ता. 4) खंडोबाचा जागर असून त्यादिवशी वाघ्या-मुरळीचा कार्यक्रम होईल. रात्री साडेनऊ वाजता कुर्ली येथील नटराज सोंगी भजनाचा कार्यक्रम होईल. 

शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय मित्रमंडळाच्या वतीने चंपाषष्ठी सोहळा होतो. काळाच्या ओघात आसपास अपार्टमेंटचे जाळे उभे राहिले. त्यामुळे मंदिराच्या ऐतिहासिक रूपाला धक्का बसला असला तरी मंदिराचे रूप पूर्वीप्रमाणेच देखणे आणि मजबूत आहे. खंडोबाच्या हळदी व विवाह सोहळ्याच्या वेळी भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहतात. महालक्ष्मी मंदिर परिसरातील खंडोबा देवालयातही या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

ठिकठिकाणी भरतात यात्रा 

जेजुरीसह राज्यात ठिकठिकाणच्या खंडोबा देवस्थानांतर्फे चंपाषष्ठी उत्सव केला जातो. सांगलीत पद्माळे येथील कचरनाथ मठ, मंगसुळी येथेही हा उत्सव साजरा होतो. नगर जिल्ह्यात कोरठण येथे खंडोबाचा उत्सव होतो. कोल्हापुरातही हा उत्सव पारंपरिक उत्साहात केला जातो. विदर्भातील आमगावाच्या देवस्थानला सुमारे सव्वाशेहून अधिक वर्षांच्या नवरात्रोत्सवाची परंपरा आहे. या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com