"लई वांड झालयसं, शिंग फुटल्यात काय'... 

लुमाकांत नलवडे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

"कवातर हातावर पाणी घाला', "लई वांड झालयसं', "शिंग फुटल्यात काय', ही आहे, लळा लावणारी रांगडी अस्सल कोल्हापुरी भाषा. "जगात भारी आम्ही कोल्हापुरी' हा केवळ "स्लोगन' नाही तर त्याची वैशिष्टेसुद्धा तशीच आहेत. मदतीला धावून येणारी, एखाद्या पर्यटकाने पत्ता विचारला तर स्वतःहून पुढे घेऊन जाणारी, स्वाभिमानी माणसं याच कोल्हापुरात आहेत.

टेंबलाईवाडी (कोल्हापूर) ः "कवातर हातावर पाणी घाला', "लई वांड झालयसं', "शिंग फुटल्यात काय', ही आहे, लळा लावणारी रांगडी अस्सल कोल्हापुरी भाषा. "जगात भारी आम्ही कोल्हापुरी' हा केवळ "स्लोगन' नाही तर त्याची वैशिष्टेसुद्धा तशीच आहेत. मदतीला धावून येणारी, एखाद्या पर्यटकाने पत्ता विचारला तर स्वतःहून पुढे घेऊन जाणारी, स्वाभिमानी माणसं याच कोल्हापुरात आहेत. इंटरनेटच्या युगात सुद्धा आपलंपण जपणाऱ्या कोल्हापुरातील इलेक्‍ट्रिक अभियंत्याची पदवी घेतलेल्या तरुणाने हे "अस्सल कोल्हापुरी' शब्द आपल्या हॉटेलात झळकवले आहेत. 

हे पण वाचा - रायगडावर येऊन महाराष्ट्राची माफी मागा ; कोल्हापूरात शिवप्रेमी भडकले

सायबर, शिवाजी विद्यापीठ परिसरात पाच-सहा जिल्ह्यातील विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. विविध प्रांतातून या ना त्या माध्यमातून प्राध्यापक येतात. या सर्वांना कोल्हापूरची आपुलकी दाखविण्याचा प्रयत्न या हॉटेलात झाला आहे. शुभंम चव्हाण असे तरूणाचे नाव आहे. त्यांनी स्वतः इलेक्‍ट्रिकमधून अभियंत्याची पदवी घेतली आहे. अलीकडे या क्षेत्रात नोकऱ्याच नसल्यामुळे त्यांनी कुकींकचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर काही दिवस पुण्यातील हॉटेलमध्ये काम केले. मात्र कोल्हापुरात राहण्याची आणि खाण्याची मजाच वेगळी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा कोल्हापुरात येण्याचा निर्णय घेतला. स्वतः उच्चशिक्षित असताना, जगातील नव्या घडामोडींचा वेध असतानाही स्वतःच्या हॉटेलमध्ये अस्सल कोल्हापुरी बोली भाषेतील शब्दांचा वापर करून कोल्हापुरी रांगडी भाषा जपण्याचा प्रयत्न केला आहे. 

हे पण वाचा - अन् मोपेडस्वार तरुणी पडली नदीत...

अस्सल कोल्हापुरी बोली भाषेतील काही शब्द 
*सप्पय गावलईस, जरा सुक्क वाडा, थर्ड मारायचं बंद करा, गाडीचं टवळं फुटलय मर्दा, तुम्ही काय मोठी माणंस, पब्लिक खुळं झालय, चाळणीत पाणी घे आणि जीव देजा, लायनीला भेटायं गेलयं, कवा बसुया, जरा सुक्क वाडा, पदरचं पैशे घालून आलोय, हिंड अजुन ऊन्नातनं, ये कॅशेट बंद कर, लय मॉंड झालयस, एक नंबर भावा 

कोल्हापुरी भाषेचा अभिमान 

कोल्हापुरी बोलीभाषा आपुलकी आणि प्रेमाची आहे, रांगडी आहे. मी पुण्यात काही दिवस हॉटेलात काम केले आहे. तिथंल्या लोकांना त्यांच्या पुणेरी शब्दांचा अभिमान आहे. तर आपल्याला आपल्या कोल्हापुरातील शब्दांचा अभिमान नाही का ? म्हणूनच मी कोल्हापुरातील अस्सल बोली भाषेतील शब्द हॉटेल लिहिले आहेत. मला त्याचा अभिमान आहे. 

शुभंम चव्हाण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur language in hotels