करवीर, दक्षिण, उत्तर मतदारसंघ ठरणार निर्णायक

करवीर, दक्षिण, उत्तर मतदारसंघ ठरणार निर्णायक

कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघांपैकी करवीर, दक्षिण व उत्तर मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांचीच भूमिका निर्णायक ठरणार आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक व त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांचाही उत्तरसह इतर दोन मतदारसंघांतील वाढता राबता पाहता या तिन्हीही मतदारसंघांचे महत्त्व अधोरेखित राहणार आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या वेळी श्री. महाडिक व प्रा. मंडलिक यांच्यातच लढत झाली होती. या लढतीत राधानगरी, कोल्हापूर दक्षिण व करवीर मतदारसंघाने श्री. महाडिक यांना; तर कागल, कोल्हापूर उत्तर व चंदगड मतदारसंघाने प्रा. मंडलिक यांना मताधिक्‍य दिले.

गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्या निवडणुकीत श्री. महाडिक यांच्या पाठीशी असलेले आमदार सतेज पाटील आज उघड विरोधात आहेत. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीतून श्री. महाडिक यांना वाढता विरोध आहे. अशा स्थितीत या वेळची लढतही महाडिक विरुद्ध मंडलिक अशीच होईल. सेना-भाजपची युती झाली नाही तर भाजपचा तिसरा उमेदवार असेल; पण चुरस या दोघांतच असणार आहे. 

कागलमध्ये पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्व आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हा मतदारसंघ नेहमीच स्थानिक उमेदवारांच्या मागे उभा राहिला आहे.  (कै.) सदाशिवराव मंडलिक यांनी २००९ मध्ये बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, त्या वेळी श्री. मुश्रीफ या मतदारसंघाचे आमदार असूनही लोकांनी मंडलिक यांना मताधिक्‍य दिले. २०१४ मध्येही प्रा. मंडलिक यांनाच मताधिक्‍य आहे. त्यामुळे २०१९ मध्ये स्थानिक उमेदवार म्हणून कदाचित पुन्हा प्रा. मंडलिक यांनाच पसंती असेल.

राधानगरी व चंदगडमध्ये ‘गोकुळ’च्या राजकारणाचा प्रभाव पक्षापेक्षा जास्त असेल. राधानगरीत ए. वाय. व के. पी. हे राष्ट्रवादीचे आजी-माजी जिल्हाध्यक्ष आहेत. विधानसभेवरून दोघांत शह-काटशहाचे राजकारण असले तरी लोकसभेला पक्ष म्हणून तरी त्यांना श्री. महाडिक यांच्या मागे ताकद उभी करावी लागेल. चंदगडच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर राष्ट्रवादीच्या आहेत. श्री. महाडिक व त्यांचे नातेसंबंध आहेत, त्यामुळे त्यांचीही रसद श्री. महाडिक यांच्या मागे असेल. मात्र, गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात प्रा. मंडलिक यांना १९ हजारांचे मताधिक्‍य आहे.

‘उत्तर’मधील कसबा बावडा या प्रभागावर आमदार सतेज पाटील यांचा प्रभाव आहे. याशिवाय ‘दक्षिण’चे ते माजी आमदार आहेत आणि करवीरमध्येही त्यांना मानणारा मोठा गट आहे. याच्या जोरावर ते कोणालाही हादरे देऊ शकतात. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. पक्षीय पातळीवर माजी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आघाडी धर्म पाळणार यात शंका नाही. त्याच्या जोडीला ‘गोकुळ’चे राजकारणही त्यांच्यासोबत असेल. गेल्या निवडणुकीत पी. एन. यांचा प्रभाव असलेल्या करवीरमधून तब्बल ३४ हजारांचे मताधिक्‍य श्री. महाडिक यांना होते; पण विधानसभेला पी. एन. यांना निसटता पराभव सहन करावा लागला. ही सर्व पार्श्‍वभूमी व सद्यःस्थिती पाहता करवीर, दक्षिण व उत्तर हे तीनच मतदारसंघ लोकसभेला निर्णायक असतील.
 

२०१४ मधील मतदारसंघनिहाय मिळालेले मतदान
विधानसभा मतदारसंघ    धनंजय महाडिक    प्रा. संजय मंडलिक    मताधिक्‍य    कुणाला 
चंदगड    ८२,२०५    १,०१,४७३    १९,२६८    प्रा. मंडलिक
राधानगरी    १,१७,२९२    ९३,००४    २४,२८८    खा. महाडिक
कागल    १,०५,६२७    १,१४,७७३    ९१४६    प्रा. मंडलिक
दक्षिण    ९९,६०५    ९२,३५१    ७,२५४    खा. महाडिक
करवीर    १,१९,९४४    ८५,३६५    ३४,५७९    खा. महाडिक
उत्तर    ८२,५११    ८६३९६    ३,८८५    प्रा. मंडलिक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com