कोल्हापूर पालिका महापौर निवडीतही येणार रंगत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

स्थायी सभापतीनंतर भाजपने महापौरपद लक्ष्य केले असल्याने पुढील महिन्यात होणारी महापौरपदाची निवडणूक चांगलीच रंगणार आहे.

कोल्हापूर - स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दोन नगरसेवक फोडून झलक दाखविली. सत्तेसाठी कोणत्याही पातळीवर उतरण्यास आम्ही तयार आहोत, असाच संदेश त्यांनी स्थायीच्या निवडणुकीत दिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर महापालिकेतील सत्ता टिकविण्याचे आव्हान आहे. स्थायी सभापतीनंतर भाजपने महापौरपद लक्ष्य केले असल्याने पुढील महिन्यात होणारी महापौरपदाची निवडणूक चांगलीच रंगणार आहे.

महापालिकेतील घोडेबाजार थांबविण्यासाठी दहा वर्षांपासून महापालिकेत पक्षीय राजकारण आणण्याचा प्रयत्न दोन्ही काँग्रेसने केला. पूर्वी काँग्रेस पक्षच आघाडीच्या माध्यमातून महापालिकेतील सत्तेत असायचा. राजकारणात काँग्रेसला प्रबळ उमेदवार नव्हता. 

महापौरपदाचे चर्चेतील उमेदवार
काँग्रेस : शोभा पंडितराव बोंद्रे, इंदुमती माने, उमा बनछोडे, 
जयश्री चव्हाण, निलोफर आजरेकर, दीपा मगदूम
भाजप व ताराराणी : जयश्री जाधव, तेजस्विनी इंगवले, 
सविता भालकर, भाग्यश्री शेटके

गेल्या निवडणुकीपर्यंत महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसला शिवसेनेने अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही; मात्र आतापर्यंत अनेकवेळा पदाधिकारी निवडीत सेनेची महत्त्वाची भूमिका राहिली. महापालिकेच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप, ताराराणी आघाडीला सोबत घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरला. त्यांना सत्ता मिळाला नाही; पण खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाचे काम सुरू झाले. 

बलाबल असे...

  •  काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी : ४२
  •  राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेल्यांची संख्या : २
  •  भाजप व ताराराणी आघाडी : ३३
  •  शिवसेना : ४

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर करावयाचा आहे. त्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. गेल्या स्थायी सभापतीपदाच्या निवडीत पालकमंत्री पाटील बिनआवाजाचा बॉम्ब फोडण्यात यशस्वी झाले. 

सभापती निवडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप-ताराराणी आघाडीनेही आपले सदस्य सहलीवर पाठविले. सहलीवर गेलेल्यांत राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे व अजिंक्‍य चव्हाण होते. पण सभापती पदाच्या निवडणूक मतदानावेळी पिरजादे व चव्हाण यांनी भाजपचे कमळ हातात घेतले.

स्थायी सभापती पदाच्या निवडणुकीतच भाजपने पुढील महिन्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीची झलक दाखविली. काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य संख्याबळ कागदावर ४५ आहे. त्यापैकी पिरजादे व चव्हाण सध्या राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यामुळे संख्याबळ दोनने कमी झाले. आगामी महापौरपद निवडणुकीत भाजपचा महापौर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यांनी जोडण्या सुरू केल्या आहेत.

दोन्हीकडेही नाराज
काँग्रेस व राष्ट्रवादीमध्येच केवळ नाराज नाहीत तर भाजप-ताराराणी आघाडीतही अनेक नगरसेवक नाराज आहेत. स्थायी सभापती आशिष ढवळे यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावरून ही नाराजी उघड झाली. त्यांच्याच विरोधी पक्षनेत्यांनी आघाडीला घरचा आहेर दिला. 

याशिवाय भाजप-ताराराणी आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे काही कारभारी झाले आहेत. हे कारभारी अन्य सदस्यांना विश्‍वासात घेत नसल्याचे उघडपणे भाजप-ताराराणी आघाडीचे काही नगरसेवक बोलत असतात. याचा फायदा काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते उचलण्याचा प्रयत्न करतील.

Web Title: Kolhapur New Mayor election special