धरणांतील पाण्याची बारा टक्के वाफ

सुनील पाटील
मंगळवार, 3 एप्रिल 2018

कोल्हापूर - उन्हाच्या तडाख्याचा सर्वांनाच फटका बसतो आहे. यंदा मात्र कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील धरणातील ७० टीएमसी पाण्यासाठ्यापैकी सरासरी ११ ते १२ टक्के म्हणजेच ८ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. भविष्यात जमिनीवरील पाण्याचा साठा तर केलाच पाहिजे; पण हा साठा जमिनीतही करावा लागणार, असे वास्तवावरून लक्षात येते. 

कोल्हापूर - उन्हाच्या तडाख्याचा सर्वांनाच फटका बसतो आहे. यंदा मात्र कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील धरणातील ७० टीएमसी पाण्यासाठ्यापैकी सरासरी ११ ते १२ टक्के म्हणजेच ८ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. भविष्यात जमिनीवरील पाण्याचा साठा तर केलाच पाहिजे; पण हा साठा जमिनीतही करावा लागणार, असे वास्तवावरून लक्षात येते. 

जिल्ह्यात एकूण १३ धरणे आहेत. यात सुमारे ७० टीएमसी पाणीसाठा होतो. या साठ्यातून गळती, पाण्याचा अनावश्‍यक वापर यामुळे पाण्याची नासाडी होते. याशिवाय पाण्याचे बाष्पीभवनही होते. याची सरासरी २ ते ३ टक्‍क्‍यांपर्यंत होती. या चार ते पाच वर्षामध्ये बाष्पीभवनाची टक्केवारी सरासरी ५ टक्‍क्‍यांपर्यंत गेली. साठा केलेल्या पाण्यातून ११ ते १२ टक्‍के पाण्याची वाफ होते. त्यामुळे किंचित का असेना; पण धरणातील पाणीसाठा कमी करण्यात कडक उन्हाचाही वाटा आहे.

सध्या मार्चपासूनच उन्हाचा पारा ३९ ते ४० डिग्रीपर्यंत पोहोचला. एप्रिल आणि मे महिनाही असा कडक उन्हाचा असणार असा अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील पाणीसाठा समाधानकारक असला तरीही पाण्याचे बाष्पीभवन कमी कसे करायचे, हे सध्या तरी कोणाच्याच हातात नाही. धरणातील पाणीसाठ्याबाबतच्या बाष्पीभवनाचे झाले, आता हेच पाणी नदीतून सोडले जाते त्यावेळीही २ ते ३ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते.

त्यामुळे जिल्हा पाण्याने समृद्ध असला तरी भविष्यातील धोका ओळखून जमिनीवरील पाण्याच्या साठ्यासह जमिनीखालीही पाण्याचा साठा वाढवावा लागणार आहे. सुरुवातीला जेवढ्या पाण्याचे बाष्पीभवन होते, किमान तेवढे पाणी जमिनीत शिल्लक ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 

‘समतल चर’ हाच यावरील पायाभूत पर्याय आहे. मात्र मिळणारे पाणी वापरायचे पण ते साठा करून ठेवायची सवय लोकांना नाही. आता भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.  

असे करतात बाष्पीभवनाचे निरीक्षण
जेवढे जलाशय आहेत, त्या जलाशयाच्या विविध ठिकाणी आणि समांतर पातळीवर प्लास्टिकचे कॅन भरून ठेवले जातात. यामध्ये सूर्योदय झाल्यापासून ते सूर्यास्तापर्यंत पाण्याची पातळी किती कमी होते, यावरून बाष्पीभवनाचे निरीक्षण केले जाते. यावरून वर्षात सरासरी किती टक्के पाण्याचे बाष्पीभवन केले जाते, याचा अंदाज काढला जातो. यामध्ये इतर महिन्यांपेक्षा उन्हाळ्यातील चार महिन्यांत सर्वाधिक पाण्याची वाफ झाल्याचे निदर्शनास येते.

जिल्ह्यातील एकूण पाणीसाठ्यांपैकी ११ ते १२ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तापमान वाढीमुळे हा परिणाम दिसून येतो. दरम्यान, जमिनीवरील पाणीसाठ्यासोबत भूगर्भातील पाणीसाठा वाढवावा लागणार आहे. 
-किरण पाटील,
सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर
 

Web Title: Kolhapur News 12 percent water loss from dam due to evaporation