पदवीधर नावनोंदणीचा आकडा पंधरा हजारांवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

कोल्हापूर - विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, पदवीधर मतदार नोंदणीचा आकडा पंधरा हजारांवर पोचला आहे.

मतदारांसाठी ‘ॲड्रेस प्रूफ’ सक्तीचे केल्याने ९५ हजार नोंदणीचा आकडा अजून किती खाली येणार, याची उत्सुकता आहे. नावनोंदणीसाठी अद्याप तीन दिवस बाकी आहेत. अधिसभेवर (सिनेट) दहा पदवीधर निवडून द्यायचे असून, पदवीधरांची नावनोंदणी महत्त्वपूर्ण आहे. 

कोल्हापूर - विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, पदवीधर मतदार नोंदणीचा आकडा पंधरा हजारांवर पोचला आहे.

मतदारांसाठी ‘ॲड्रेस प्रूफ’ सक्तीचे केल्याने ९५ हजार नोंदणीचा आकडा अजून किती खाली येणार, याची उत्सुकता आहे. नावनोंदणीसाठी अद्याप तीन दिवस बाकी आहेत. अधिसभेवर (सिनेट) दहा पदवीधर निवडून द्यायचे असून, पदवीधरांची नावनोंदणी महत्त्वपूर्ण आहे. 

शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून अर्थात १९६२ ते २०१५ दरम्यानच्या पदवीधरांच्या नोंदणीचा आकडा ९५ हजार इतका सांगण्यात येतो. दर पाच वर्षांनी पदवीधरांची नोंदणी होत असली, तरी ज्यांचे पत्ते बदलले, जे मृत झाले, त्यांची नावे कमी झाली नाहीत. प्रत्यक्ष पदवीधरांची नावनोंदणी होत असली, तरी मतदार यादीचा आकडा कमी आहे. महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍टच्या अंमलबजावणीनंतर पदवीधरांच्या नावनोंदणीस सुरवात झाली. या नोंदणीसाठी मात्र ॲड्रेसप्रूफ सक्तीचे केले आहे. पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहन परवाना, शिधापत्रिका आदी कागदपत्रे ॲड्रेस प्रूफ म्हणून पदवीधरांना सादर करायची आहेत. त्यामुळे आपोआपच नोंदणीचा खरा आकडा यंदा कळेल. शिवाय, बोगस मतदारांनाही चाप बसणार आहे. तूर्त पंधरा हजार इतकी नावनोंदणी झाली आहे. 

अधिसभेवर दहा पदवीधर निवडून द्यायचे असून, त्यासाठी पदवीधर मतदारांनी मतदान करायचे आहे. दहा पदवीधरांसह विद्यापीठ अधिकारी, शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक, कुलपती व कुलगुरू नामनिर्देशित सदस्य, पदव्युत्तर प्राध्यापक, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांचा अधिसभेत समावेश आहे. व्यवस्थापन परिषदेची (मॅनेजमेंट कौन्सिल) एकूण संख्या २२ असून, त्यात विद्यापीठ पदाधिकारी, निवडून येणारे सदस्य, नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असेल. प्राचार्य, प्राध्यापक, संस्था प्रतिनिधी, पदवीधर, निमंत्रित सदस्य यांचा समावेश असणार आहे. प्रत्येक गटात त्या-त्या गटातील सदस्य मतदान करतील. पदवीधराच्या गटात मात्र पदवीधर नावनोंदणी केलेले मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे पदवीधरांची नावनोंदणी किती होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

दृष्टिक्षेपात..
विद्यापीठ अधिकारी     १८
पदवीधर     १०
शिक्षक     १०
प्राचार्य     १०
संस्थाचालक     ६
कुलपती नामनिर्देशित     १०
कुलगुरू नामनिर्देशित     ७
पदव्युत्तर शिक्षक     ३
विद्यार्थी कल्याण मंडळ अध्यक्ष व सचिव    २
अधिसभा (सिनेट) रचना     एकूण- ७६

Web Title: kolhapur news 15000 graduate name registration