फॉरेन्सिक लॅबसाठी ३० कोटी

भूषण पाटील
शुक्रवार, 29 जून 2018

कोल्हापूर -  कसबा बावडा परिसरातील गोळीबार मैदान परिसरात अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब आणि इमारतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावाला गृह विभागाने मंजुरी दिली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरला येथे भूमिपूजन होईल. दोन एकर जागेत ३० कोटी मंजूर केले आहेत.

कोल्हापूर -  कसबा बावडा परिसरातील गोळीबार मैदान परिसरात अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब आणि इमारतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावाला गृह विभागाने मंजुरी दिली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरला येथे भूमिपूजन होईल. दोन एकर जागेत ३० कोटी मंजूर केले आहेत.

येथील प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा जुन्या पुणे-बंगळूर मार्गावरील जीवन प्राधिकरणाच्या इमारतीत आहे. यासाठी प्रशासनाने कसबा बावडा येथील गोळीबार मैदान हे ठिकाण निश्‍चित केले आहे. पोलिस हाऊसिंग महामंडळाकडून इमारतीचे काम केले जाणार आहे. तीन प्रस्तावित आराखड्यांपैकी एकाची निश्‍चिती झाल्यानंतर कामाला सुरवात होणार आहे.
जिल्ह्यात व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्यास शवागृहात डॉक्‍टरांकडून ‘व्हिसेरा’ राखून ठेवला जात होता.

शवविच्छेदनावेळी शरीरातील किडनी, जठर, रक्त, मेंदू आदी काढलेले भाग पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जायचे. त्याचबरोबर हस्ताक्षराची तपासणी, सडलेला मृतदेह, बलात्कार पीडित तरुणी, महिला व आरोपींच्या रक्ताचे नमुने यांची चाचणी याच प्रयोगशाळेतून केली जात होती. दहा ते बारा जिल्ह्यांतून आलेल्या व्हिसेऱ्याची चाचणी या प्रयोगशाळेत केली होत असल्याने व्हिसेराचा अहवाल मिळण्यासाठी सहा-सात महिने किंवा वर्षही उलटत होते. 

फॉरेन्सिक लॅब कोल्हापुरात सुरू करावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देत गृह विभागाने येथील लॅबला मंजुरी दिली. या लॅबसाठी गोळीबार मैदान आणि केर्ली येथील जागांचे प्रस्ताव देण्यात आले होते. लॅबची आवश्‍यकता पाहून ताराराणी चौकातील जीवन प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये १ एप्रिल २०१६ पासून तात्पुरत्या स्वरूपात ही लॅब सुरू करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचा शारीरिक तसेच मानसिक त्रास वाचला आहे. लॅबच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. नवीन इमारतीमध्ये सध्या सुरू असलेल्या चार विभागांबरोबरच सायबर आणि टी. ए. एस. आय. (टेप अँड स्पीकर आयडेंटिफिकेशन) या दोन अतिरिक्त विभागांचाही समावेश आहे.

कोल्हापूर येथील फॉरेन्सिक लॅबसाठी गोळीबार मैदान येथील जागेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. ६ हजार ५५७ चौरस फूट जागेत अत्याधुनिक लॅब होईल. यासाठी ३० कोटींचा निधी शासनाने दिला आहे. पोलिस हाऊसिंग महामंडळाकडून ऑगस्टमध्ये कामाला सुरवात केली जाईल, अशी अपेक्षा आहे. 
- डॉ. कृष्णा कुलकर्णी,
प्रभारी संचालक

आधुनिक व सुसज्ज फॉरेन्सिक लॅबच्या कामाला लवकर सुरवात होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. शिवाय भक्कम पुराव्यामुळे शिक्षेच्या प्रमाणातही वाढ होईल.
- डॉ. संगीता घुमटकर,
उपसंचालक 

विभाग असे
तात्पुरत्या जागेत सुरू असलेले विभाग : जीवशास्त्र, विषशास्त्र दारूबंदी, सामान्य विश्‍लेषण. 
नवीन इमारतीमध्ये : सायबर आणि टी. ए. एस. आय. हे अतिरिक्त विभाग असतील

राज्यातील फॉरेन्सिक लॅब 
पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, नाशिक.

Web Title: Kolhapur News 30 cores of Forensic lab