वर्कशॉपकडील ५० वाहने पासिंगविना

वर्कशॉपकडील ५० वाहने पासिंगविना

कोल्हापूर - केएमटी बसबरोबरच महापालिकेचे वाहन जवळून जात असेल तर सावधान...! अशा वाहनापासून एखाद्याचा जीव जाण्याची आणि कुटुंबही उद्‌ध्वस्त होण्याची शक्‍यता आहे. कारण महापालिकेच्या वर्कशॉप विभागाकडील तब्बल ५० वाहनांचे पासिंगच (फिटनेस) प्रादेशिक परिवहन विभागाकडून करून घेतले नसल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

१ ऑक्‍टोबरला केएमटी अपघाताची मोठी दुर्घटना घडूनही महापालिका प्रशासनाला अजून जाग आलेली नाही. संपूर्ण शहराला आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचे काम करणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन दल, रुग्णवाहिका, शववाहिका, पाण्याचे टॅंकर, कचरा वाहतूक करणारे डंपर, अतिक्रमण ट्रक, जेटिंग मशिन अशा अवजड वाहनांचा यामध्ये समावेश आहे. स्वत:बरोबरच शहरवासीयांवरही आपत्ती ओढवून घेण्याचा हा प्रकार आहे. कारण अशा वाहनाने अपघात केला आणि जर कोण दगावले तर कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई अपघातातील मयताच्या वारसांना मिळत नाही. तसेच या वाहनावर काम करणारे चालक, रस्त्यावरचे नागरिक यांच्या दृष्टीने ही खूप मोठी जोखीम आहे.

१ ऑक्‍टोबरला महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसला पापाची तिकटी येथे मोठा अपघात झाला. ही बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसल्याने या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यानंतर महापालिकेच्या केएमटीच्या आणि एकूणच सगळ्याच कारभाराचे वाभाडे शहरभर निघत आहेत.

महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना कसलेच गांभीर्य नाही. वर्कशॉपमध्ये तर वरिष्ठ अधिकारी जबाबदारी घेऊन काम करत नसल्याने अंदाधुंद कारभार आहे. ५० वाहनांचे पासिंगच (फिटनेस) आरटीओकडून करून घेतले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. वैशिष्ट्य म्हणजे एकेका वाहनाचे पासिंग दहा वर्षे झालेले नाही.

अत्यावश्‍यक आणि आपत्ती काळात मदतीसाठी धावून जाणारे फायर फायटर, रुग्णवाहिका, शववाहिका, पाण्याचे टॅंकर, मैला टॅंकर, ट्रक, डंपर, ट्रॅक्‍टर ट्रॉली यांचेही पासिंग झालेले नाही. महापालिकेचा अग्निशमन विभाग संपूर्ण शहराला आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देतो, पण याच विभागाच्या फायर फायटर, रुग्णवाहिकेसह सर्वच वाहनांचे पासिंग झालेले नाही. खूप मोठी जोखीम घेऊन ड्रायव्हर वाहने चालवितात. 
महापालिका या वाहनांच्या माध्यमातून शहरातील अत्यावश्‍यक सेवा बजावत असल्या तरी अशी लोकांच्या जीवावर बेतणारी जोखीम घेऊन काम करणे अतिशय चुकीचे आहे. 

स्पीड गव्हर्नरच्या निविदेतच अडकली यंत्रणा
अवजड वाहनांचा वेग नियंत्रित करणारी यंत्रणा (स्पीड गव्हर्नर) बसविल्याशिवाय प्रादेशिक परिवहन विभागाकडून पासिंग केले जात नाही. महापालिकेच्या अवजड वाहनांना हे स्पीड गव्हर्नर बसविण्याचा प्रस्ताव वर्कशॉप विभागाने २८ सप्टेंबर २०१६ ला तयार केला. या प्रस्तावाला मान्यता मिळणे, टेंडर काढणे, टेंडर मंजूर करणे या प्रक्रियेला एक वर्ष झाले तरी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. लोकांच्या जीवाशी खेळ करणारा हा बेधुंद कारभार महापालिकेकडून सुरू आहे.  

विभागप्रमुखांचा आदेश स्थगित
महापालिकेच्या वर्कशॉप विभागातील पासिंग न झालेली वाहने आज सुभाष स्टोअर्स या वर्कशॉपच्या बाहेर सोडू नयेत,असे आदेश वर्कशॉप विभागप्रमुखांनी दिले होते.पण ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शहरातील सेवा,सुविधांवर परिणाम होउ नये,म्हणून एक तासातच हा आदेश मागे घेतल्यामुळे शहरातील सेवा पुन्हा सुरु झाल्या.पाण्याचे टॅंकर, कचरा वाहतूक करणारे डंपर,मैला सॅक्‍शन करणारी वाहने यांचे पासिंगच झालेले नाही.  ही वाहने महापालिका शहरवासियांना देत असलेल्या सेवा सुविधांसाठीच रस्त्यावर असतात. परंतु पासिंग न करता वाहन चालविणे चुकीचे आहे. वर्कशॉपमधील अधिक्षकांच्या आदेशामुळे शहरातील सेवा,सुविधा पुरविण्यात खंड पडू लागल्यामुळे एक तासाच्या आतच हा आदेश मागे घेतला.

रुग्णवाहिकेचाच ब्रेक फेल
महापालिकेच्या वर्कशॉप विभागाकडच्या एका रुग्णवाहिकेचा दोनच दिवसांपूर्वी दसरा चौकात ब्रेक फेल झाला. चालकाने प्रसंगावधान साधून कशीबशी रुग्णवाहिका एका फूटपाथवर आदळून थांबविली; अन्यथा या रुग्णवाहिकेलाच अपघात झाला असता. या रुग्णवाहिकेचे स्टेअरिंगही इतके जाम आहे की, दोघांनी धरून वळविले तरी रुग्णवाहिकेला वळण घेता येईल, याची गॅरंटी नाही. 

पासिंग नसल्याचा परिणाम
अवजड वाहनाचे पासिंग झाल्याशिवाय अशा वाहनांचा विमा काढला जात नाही. पासिंग आणि विमा नसलेल्या वाहनाने अपघात केला आणि अशा अपघातात कोण दगावले तर कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे महापालिकेचे वाहन जवळून जात असेल तर चार हात लांबच थांबलेले बरे.

महापालिकेची अशी वाहने जर शहरात फिरत असतील तर आमचे अधिकारी या प्रकाराची खातरजमा करतील. सर्वोच्च न्यायालय आणि रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशानुसार असे वाहन चालविणाऱ्या चालकाचा परवाना तातडीने निलंबित होईल, तसेच संबंधित वाहनही जप्त केले जाईल. 
 - डॉ. डी. टी. पवार 
   (प्रादेशिक परिवहन अधिकारी)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com