जिल्ह्यात खरिपाच्या साठ टक्के पेरण्या पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

पाऊसमान समाधानकारक - सरासरी ३३३.७९ मिलिमीटर नोंद 
कोल्हापूर - जिल्ह्यात आजअखेर जवळपास साठ टक्‍के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरणीसाठी समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे पेरण्या सुरू असून, आठवड्यात पेरण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, जूनपासून आजअखेर सरासरी ३३३.७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाऊसमान समाधानकारक - सरासरी ३३३.७९ मिलिमीटर नोंद 
कोल्हापूर - जिल्ह्यात आजअखेर जवळपास साठ टक्‍के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरणीसाठी समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे पेरण्या सुरू असून, आठवड्यात पेरण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, जूनपासून आजअखेर सरासरी ३३३.७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

चालू वर्षी निव्वळ खरीप पिकांचे सर्वसाधारण २ लाख ६३ हजार २५७ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यातील १ लाख ४२ हजार ३३६ हेक्‍टर क्षेत्र ऊसखाली आहे. ४ लाख ५ हजार ६९३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणीची उद्दिष्ट आहे. आजअखेर १ लाख ५५ हजार ५७७ हेक्‍टर म्हणजे ५९.२१ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात भाताखाली १ लाख ८ हजार ६५२ हेक्‍टर क्षेत्र आहे. आतापर्यंत साधारणपणे ६० हेक्‍टरवर भाताची पेरणी झालेली आहे. नाचणीचे २१ हजार ४२४ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी साधारणपणे दीड हजार हेक्‍टरवर पेरणी झालेली आहे. राहिलेल्या रोपलागणीच्या कामाला सध्या वेग आलेला आहे. मका पिकाचे पेर क्षेत्र २ हजार ७९७ असून, त्यापैकी साधारणपणे ८०० हेक्‍टरवर पेरणी झालेली आहे. 

ज्वारीचे पेर क्षेत्र ७ हजार १८४ हेक्‍टर असून, आतापर्यंत २ हजार २८२ हेक्‍टरवर पेरणी झालेली आहे. पिकाची उगवण समाधानकारक असून, उर्वरित क्षेत्रात पेरणीची कामे गतीने सुरू आहेत. ज्वारी, भुईमूग पिकामध्ये आंतरिक पीक म्हणून तसेच भात क्षेत्राच्या शेताच्या बांधावर आपल्याकडे तूर, मूग, उडीद, चवळी, घेवडा आदी उप पिके घेतली जातात. त्याचे क्षेत्र साधारणपणे १४ हजार ८४६ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५ हजार ७४३ हेक्‍टरवर पेरणी झालेली आहे.

अलीकडील काळात सोयाबीन पिकाचे क्षेत्र आपल्याकडे वाढत आहे. साधारणपणे ५१ हजार ६६६ हेक्‍टर पीक क्षेत्र सोयाबीन असून, त्यापैकी १४ हजार ८४६ क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. या पिकाच्या आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. भुईमुगाचे पेरक्षेत्र ५२ हजार हेक्‍टर असून, त्यापैकी ४१ हजार ६२९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात सर्वात अधिक क्षेत्र हे ऊस पिकाखाली आहे. १ लाख ४२ हजार ३३६ हेक्‍टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. 
त्यापैकी हातकणंगले तालुक्‍यात ६१४ हेक्‍टरवर आडसाली उसाची लागण पूर्ण झाली आहे. २०१७-१८ मध्ये १ लाख ४३ हजार ९०५ हेक्‍टर क्षेत्रावर ऊस पीक आहे.

दृष्टिक्षेपात...
वार्षिक पर्जन्यमान १८९९.०४ मि.मी. 
आंतरपीक म्हणून भुईमुगाकडे कल
सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात वाढ
जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र उसाखाली
हातकणंगलेत ६१४ हेक्‍टरवर आडसाली ऊस

खरीप पिकांच्या पेरणीसाठी आवश्‍यक पाऊस झाल्याने पावसाअभावी पिकांचे नुकसान झालेले नाही. धूळवाफ पेरक्षेत्रात तसेच पाण्याची सोय असलेल्या पेर क्षेत्रावरील पिकास उपयुक्‍त पाऊस झाला आहे. पावसाअभावी दुबार पेरणी, पीक कोमजणे, क्षेत्र नापेर राहणे अशा प्रकारची परिस्थिती कोठेही झालेली नाही.

- चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी

Web Title: kolhapur news 60% kharip cultivation complete