शिवछत्रपती पुरस्कारासाठी ६५० प्रस्ताव

संदीप खांडेकर
गुरुवार, 4 जानेवारी 2018

कोल्हापूर - तीन वर्षांच्या रखडलेल्या शिवछत्रपती पुरस्कारांसाठीच्या सुमारे साडेसहाशे प्रस्तावांची पुण्यातील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या कार्यालयात छाननी सुरू आहे. १५ जानेवारीपर्यंत ही छाननी पूर्ण होणार असून कोल्हापूर विभागातून १२० हून अधिक प्रस्ताव पाठविले गेले.

कोल्हापूर - तीन वर्षांच्या रखडलेल्या शिवछत्रपती पुरस्कारांसाठीच्या सुमारे साडेसहाशे प्रस्तावांची पुण्यातील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या कार्यालयात छाननी सुरू आहे. १५ जानेवारीपर्यंत ही छाननी पूर्ण होणार असून कोल्हापूर विभागातून १२० हून अधिक प्रस्ताव पाठविले गेले.

प्रस्तावासाठी दिलेल्या गुणांकनाबाबत हरकत घेण्याची संधी प्रस्ताव पाठविणाऱ्या प्रत्येकाला आहे. हरकती मागविल्यानंतरच पुरस्काराची घोषणा केली जाईल. मात्र यंदा कोणत्या महिन्यात पुरस्काराची घोषणा होणार, हे अद्याप अनिश्‍चित आहे. 
बदललेल्या निकषांनुसार तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. खेळाडू, मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू, कार्यकर्ता / संघटक, जिजामाता, जीवनगौरव असे गटनिहाय पुरस्कार दरवर्षी देण्याच्या प्रथेला तीन वर्षांपूर्वी खो बसला होता.

घोषणेकडे कान
कोल्हापूर विभागातील प्रस्तावांची संख्या १२० हून अधिक आहे. तीन वर्षांचा हा एकूण आकडा आहे. त्यामुळे विभागातून प्रस्ताव पाठविणाऱ्यांच्या घोषणेकडे कान लागले आहेत. यंदा तरी पुरस्कार आपल्याला मिळेल, या आशेत ते आहेत.

पुरस्कारासाठीचे निकष बदलल्याने पुन्हा प्रस्ताव मागविले. खेळाडू व मार्गदर्शकसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठीचे निकष अर्जुन पुरस्काराच्या धर्तीवर केले. पुरस्काराच्या घोषणेचा विसर पडल्याची स्थिती निर्माण झाल्याने क्रीडा वर्तुळातून नाराजीही व्यक्त होत राहिली. पुरस्काराचे निकष बदलल्याचे समजल्यानंतर क्रीडाप्रेमींत अस्वस्थता पसरली. पण त्यांना हे बदल स्वीकारून तोंडावर बोट ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. 

प्रस्तावांची छाननी १५ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. शासनातर्फे पुरस्काराची घोषणा होईल. ती कधी होणार, हे मात्र 
सध्या सांगता येणार नाही. 
- नरेंद्र सोपल, 

क्रीडा सहसंचालक  

शिवछत्रपतींच्या नावाचा पुरस्कार देण्यातील ढिसाळपणावर क्रीडा क्षेत्रातून कडाडून टीकाही होऊ लागली. यंदा मात्र शासनाने हे पुरस्कार देण्याचे मनावर घेतल्याचे दिसते. तीन वर्षांतील एकूण साडेसातशे प्रस्तावांच्या छाननीचे काम वेगाने सुरू आहे. जिल्हा क्रीडाधिकारी, क्रीडाधिकारी यांच्या देखरेखीखाली पुण्यात प्रस्तावांची छाननी केली जाते. छाननीनंतर प्रत्येक प्रस्तावाला दिलेले गुण हे ऑनलाईन ठेवणार आहेत. प्रत्येक प्रस्तावकर्त्याला दुसऱ्याचे गुण पाहण्याची संधी मिळेल. त्याविषयी हरकतही घेता येणार आहे. पुरस्कार समितीकडे त्याविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही समिती त्याची पडताळणी करेल. त्यानंतरच पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे पुरस्काराची घोषणा होऊन ते १९ फेब्रुवारीला वितरित केले जातील का, याविषयी तूर्ततरी अनिश्‍चितता आहे. 

Web Title: Kolhapur News 650 proposals for the Shiv Chhatrapati Award