कोल्हापूर जिल्ह्यात ६५१५ बालके कुपोषणाच्या जाळ्यात

सुनील पाटील
रविवार, 29 एप्रिल 2018

कोल्हापूर - जिल्ह्यातील ६५१५ बालके मध्यम आणि गंभीर तीव्र कुपोषित असल्याचे वास्तव समोर आले आहे. गंभीर तीव्र कुपोषण असणारी ८३५ व मध्यम तीव्र कुपोषित ५६८० बालकांवर उपचार सुरू आहेत. जानेवारी २०१८ अखेरपर्यंत केलेल्या सर्वेक्षणातून हे चित्र पुढे आले आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यातील ६५१५ बालके मध्यम आणि गंभीर तीव्र कुपोषित असल्याचे वास्तव समोर आले आहे. गंभीर तीव्र कुपोषण असणारी ८३५ व मध्यम तीव्र कुपोषित ५६८० बालकांवर उपचार सुरू आहेत. जानेवारी २०१८ अखेरपर्यंत केलेल्या सर्वेक्षणातून हे चित्र पुढे आले आहे. चार ते पाच वर्षांत शालेय पोषण, सकस आहार देऊनही जिल्ह्यातील बालकांची संख्या पाहता, ‘पोषण आहारावर कोण पोसतंय,’ असा सवाल उपस्थित होत आहे.  

कोल्हापुरात कोणीही उपाशी मरणार नाही. काहीही नाही मिळाले; तरीही चार ते पाच महिने ऊस खाऊन दिवस काढू शकतो असे ठासून सांगितले जाते. अशा समृद्ध जिल्ह्यात गरोदर महिलांना शासनातर्फे पोषक आणि सकस आहार दिला जातो; तरीही कुपोषणाचे संकट टळता टळत नाही. महिलांनीच आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे शेकडो मुले कुपोषणाच्या कवेत सापडली आहेत. २०१४-१५ मध्ये कुपोषित बालकांची संख्या १० हजार ४०० पर्यंत होती. 

टप्प्याटप्प्याने संख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांत कुपोषण मुक्तीची मोठी चळवळ उभी असतानाही कुपोषण प्रश्‍नाशी झगडावे लागत आहे. जानेवारी २०१८ मधील कुपोषित बालकांच्या आकडेवारीमुळे तरी शासनाचे डोळे उघडणार का, असा सवाल आहे. 
 

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरातील बालकांचे कुपोषित असण्याचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील जी कुपोषित किंवा वजन कमी असणारी बालके आहेत, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले आहे. त्यांना योग्य आहार आणि उपचार देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 
सोमनाथ रसाळ,

महिला व बालकल्याण विकास अधिकारी, जिल्हा परिषद 

 

कुपोषण टाळण्यासाठी 
गरोदर महिलांनी शेवयांचा उपमा, खीर, शिरा, अळिवाचे लाडू, प्रक्रियायुक्त सोयाबीनचे दूध, कडधान्याची भेळ, घरगुती शेंगदाणे खाण्यावर भर दिला पाहिजे. बालकांना सहा महिने केवळ स्तनपान द्यावे. 

पोषण आहार घेतलेले
जिल्हा परिषदेकडे सहा महिने ते सहा वर्षांपर्यंतच्या २ लाख ४८ हजार ६६३ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यांतील तब्बल २ लाख ४७ हजार ९१८ बालकांपैकी २ लाख ७ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी आहार घेतल्याची नोंद आहे. 

Web Title: Kolhapur News 6515 Children in malnutrition trap in district