सातशे शाळांना प्रत्येकी पाच फुटबॉल

संदीप खांडेकर
शुक्रवार, 16 जून 2017

फिफा फिव्हर - राज्यातील वीस हजार शाळांना फुटबॉलचे वाटप

फिफा फिव्हर - राज्यातील वीस हजार शाळांना फुटबॉलचे वाटप

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सातशे शाळांना प्रत्येकी पाच फुटबॉल येत्या जुलैमध्ये मिळणार आहेत. सतरा वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या प्रसारासाठी महाराष्ट्रातील वीस हजार शाळांना फुटबॉलचे वाटप होणार असून, कोल्हापूर जिल्ह्यासाठी साडेतीन हजार फुटबॉल मिळणार आहेत. सुमारे दहा लाख विद्यार्थी एकाच दिवशी मैदानावर फुटबॉलच्या प्रचारासाठी आणली जाणार आहेत. त्यामुळे अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीहा विभागातर्फे त्या संदर्भातील कार्यक्रमांचे नियोजन सुरू असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

सतरा वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा १० ते २४ ऑक्‍टोबरदरम्यान भारतात होत आहे. दिल्ली, कोलकाता, गोवा, मुंबई व गुवाहाटीतील मैदानांवर स्पर्धेतील सामने होणार आहे. स्पर्धेसह फुटबॉलचा प्रसार व प्रचार भक्कमपणे व्हावा, यासाठी शालेय शिक्षण व क्रीहा विभागाने जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यातील ज्या शहरांत फुटबॉल खेळला जातो, तेथील खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सातशे शाळांना साडेतीन हजार फुटबॉल मिळणार आहेत. राज्यातील शाळांची संख्या सुमारे वीस हजारांवर आहे. या शाळांची यादी तयार करण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे. साधारणपणे जुलैमध्ये फुटबॉलचे वाटप केले जाणार असून, त्याची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नाही. 

फुटबॉलचे वाटप झाल्यानंतर एकाच दिवशी सुमारे दहा लाख विद्यार्थी मैदानावर उतरण्याचा उपक्रमही होणार आहे. त्याचबरोबर आमदार चषक फुटबॉल स्पर्धा घेण्याची तयारीसुद्धा केली जात आहे. फिफाच्या निमित्ताने राज्यातील शाळांना फुटबॉल वाटपाचा सुखद धक्का शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिला आहे. ज्या शाळांतील विद्यार्थ्यांना फुटबॉलला पाय लावण्याची संधी मिळालेली नाही, ती त्यांना आता मिळणार आहे. राज्य शासनाचा हा उपक्रम खेळाडूंसाठी प्रोत्साहन देणारा तर ठरेलच, शिवाय भविष्यात फुटबॉलमध्ये अधिकाधिक उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी हातभार लावणारा ठरणार आहे. 

अनिकेतची छायाचित्रे झळकणार
सतरा वर्षांखालील फिफा वर्ल्ड कपमध्ये कोल्हापूरचा अनिकेत जाधव भारतीय संघातून खेळणार आहे. महाराष्ट्रातून खेळणारा तो एकमेव आहे. त्याची छायाचित्रे या उपक्रमांतर्गत डिजिटल बोर्डवर झळकणार आहेत.

Web Title: kolhapur news 700 school give to 5 football