तिसऱ्या डोळ्याने आठ खून उघड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

सीसीटीव्ही सिस्टीम आणखी होणार अद्ययावत; पोलिस मुख्यालयातून होणार वाहतूक नियत्रंण

कोल्हापूर - तब्बल आठ खून, अनेक चोऱ्या, मारामारी असे गुन्हे ज्या तिसऱ्या डोळ्यामुळे उडकीस आले, ते सीसीटीव्ही कॅमेरे आणखी अद्ययावत होणार आहेत. ट्रॅफिकसाठी आणखी काही कॅमेरे बसविण्याचे नियोजन झाले आहे. कोल्हापूर महापालिका आणि पोलिस विभागाकडून पोलिस मुख्यालयातून याचे नियंत्रण केले जात आहे. गणेशोत्सवातही याचा उपयोग होणार आहे.

सीसीटीव्ही सिस्टीम आणखी होणार अद्ययावत; पोलिस मुख्यालयातून होणार वाहतूक नियत्रंण

कोल्हापूर - तब्बल आठ खून, अनेक चोऱ्या, मारामारी असे गुन्हे ज्या तिसऱ्या डोळ्यामुळे उडकीस आले, ते सीसीटीव्ही कॅमेरे आणखी अद्ययावत होणार आहेत. ट्रॅफिकसाठी आणखी काही कॅमेरे बसविण्याचे नियोजन झाले आहे. कोल्हापूर महापालिका आणि पोलिस विभागाकडून पोलिस मुख्यालयातून याचे नियंत्रण केले जात आहे. गणेशोत्सवातही याचा उपयोग होणार आहे.

छेडछाड कराल तर सावधान, मारामारी कराल तरीही सावधान, तुमच्याकडे सीसीटीव्हीच्या माध्यमातून झूम करून पाहिले जात आहे, असाच काहीसा संदेश या गणेशोत्सवात जिल्हा पोलिस विभागाकडून देण्यात आला आहे. पोलिस मुख्यालयात असलेल्या अत्याधुनिक  सीसीटीव्ही सेंटरमधून संपूर्ण विसर्जन मिरवणूक मार्गावर विशेष नियंत्रण ठेवले जाणार आहे. यामुळे कोणी अनुचित प्रकार करण्याच्या तयारीत असेल, तरीही त्याला ताब्यात घेतले जाणार आहे.ट्रॅफिक कंट्रोल रूमवर एक पोलिस उपनिरीक्षक, सहा कर्मचारी आणि महापालिकेचा एक अभियंता यांची चोवीस तास नजर असते. 

पोलिस ठेवणार मुख्यालयातून नजर
शहरातील ६५ चौकांत १६५ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यातील १६ कॅमेरे हे टीटीझेड असेच आहेत, जे कॅमेरे तब्बल १८० अंश कोनात फिरतात. यामुळे चारही बाजू कॅमेऱ्यांत कैद होतात. यामुळे एकाच कॅमेऱ्यातून सर्व दिशांवर नजर ठेवणे पोलिसांना शक्‍य होते. 

स्मार्ट सिटीतील एक ‘सेफ सिटी’
शहरात कोठे काय चालते, हे पाहण्यासाठी तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्हीकडे पाहिले जाते. सेफ सिटी या नावीन्यपूर्ण उपक्रमातून महापालिकेने साधारण सात कोटी रुपये खर्च करून ही यंत्रणा तयार केली आहे. तत्कालीन स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी हा निधी मंजूर केला. तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या प्रयत्नातून हे शक्‍य झाले. 

गुन्हेगारीसाठी कर्दनकाळ...
रस्त्यावर होणारे चेन स्नॅचिंग, मारामारी, दरोड्यातील पळून जाणारे चोरटे यांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही कर्दनकाळ ठरला आहे. साधारण आठ खुनाचे गुन्हे उघडकीस आले, दहाहून अधिक चोरटे सापडले. मारामारीतील काही संशयितांनाही यामुळे अटक करणे शक्‍य झाले आहे. सेफ सिटीतील एक अविभाज्य घटक म्हणून सीसीटीव्हीकडे 
पाहिले जाते.

ट्रॅफिक कंटोल मुख्यालयातून होणार
शहरातील १६ चौकांतील कॅमेरे चारही दिशांना फिरणार आहेत. असेच कॅमेरे प्रत्येक सिग्नलला लावले जाणार आहेत. यामुळे जे वाहनधारक झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहतील, त्यांना थेट घरी दंडाची नोटीस जाईल. जे एकेरी मार्ग चुकविणार, जे सिग्नलच्या दुभाजकाच्या उलट्या बाजूने जाणार, सिग्नल सुरू असताना पुढे जाणार या सर्वांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील छायाचित्रासह दंडाची नोटीस पाठवण्याचे नियोजन सुरू आहे. 

एकेरी मार्गाचे उल्लंघन कराल तर 
शहरातील काही एकेरी मार्गावर वाहनधारकांना थांबविण्यासाठी किंवा तातडीने दंड करण्यासाठी कोणीही पोलिस नसतो. मात्र काही दिवसांनी संबंधित वाहनधारकाच्या घरी एकेरी मार्गाचे उल्लंघन करीत असलेल्या छायाचित्रासह पत्र पोचते. त्यानुसार थेट दंड भरावा लागतो. आजपर्यंत परदेशात असलेल्या या पद्धतीची थेट प्रक्रिया कोल्हापुरात सुरू झाल्याचे दिसून येते.

शहरातील सीसीटीव्हीमुळे आठ खून आजपर्यंत उघडकीस आले आहेत.अनेक मारामाऱ्यांतील संशयितांना अटक करणे शक्‍य झाले आहे.चोरट्यांचा माग याच सीसीटीव्हीमुळे काढणे शक्‍य झाले. सध्या काही एकेरी मार्गावरील वाहतुकीचे नियम उल्लंघन करणाऱ्यावर सीसीटीव्हीद्वारे कारवाई केली जात आहे. लवकरच वाहतूक नियत्रंण सीसीटीव्हीद्वारे होणार आहे.  
- प्रवीण चौगुले, निरीक्षक, सायबर सेल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news 8 murder open by CCTV