चौऱ्याऐंशी वर्षांचे खमके अनुवादक...!

चौऱ्याऐंशी वर्षांचे खमके अनुवादक...!

कोल्हापूर - वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पुढे काय, असा सवाल प्रत्येकालाच पडतो; पण सुरेश गुप्ते यांनी अगोदरच काही संकल्प केले होते आणि त्यांच्या पूर्तीसाठी मग त्यांचे प्रयत्न सुरू झाले. पत्रकारिता आणि फिल्म इन्स्टिट्यूटचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. इंग्रजी विषयाचे क्‍लासेस सुरू केले आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी आपली आवडती कादंबरी ‘व्हेण्डेट्टा- द स्टोरी ऑफ वन फरगॉटन’ या कादंबरीचा अनुवाद करण्यास प्रारंभ केला... आणि आता या कादंबरीची दुसरी आवृत्ती वाचकांच्या भेटीस आली असून, त्यालाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. 

दरम्यान, ‘रोजेस इन डिसेंबर’ या कादंबरीचा अनुवाद ते सध्या करत आहेत. पाठीचा त्रास असूनही ते हा अनुवाद चक्क लॅपटॉपवर ऑपरेट करत आहेत. जो कुणी प्रकाशक तयार होईल, त्यांना डायरेक्‍ट सॉफ्टकॉपीच द्यायच्या, हा त्यामागचा त्यांचा हेतू आहे. 

श्री. गुप्ते यांनी पासष्ठ वर्षांपूर्वी पाच वर्षांत इंग्रजी भाषेतील किमान एक लाख पृष्ठांचे साहित्य वाचण्याचा संकल्प केला. तेव्हाच त्यांनी ही कादंबरी विकत घेतली. २००९ मध्ये शरदबाबूंच्या ‘देवदास’ या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर केल्यानंतर जुन्या अभिजात इंग्रजी साहित्याचा अनुवाद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि १ जानेवारी २०१० ला अनुवादाला प्रारंभ केला आणि ३१ डिसेंबर २०१० ला तो पूर्ण करून अडीचशे पानांची हस्तलिखिते मित्रांना वाचायला दिली. अनुवादाचे कौतुक होऊ लागले आणि पुढे रावा प्रकाशनाने ‘व्हेण्डेट्टा ः एक सूडाचा प्रवास’ प्रकाशितही केले. दुसरी आवृत्ती मेहता पब्लिशिंग हाउसने नुकतीच प्रकाशित केली असून, त्याचेही कौतुक होऊ लागले आहे. 

काय आहे कादंबरी ?
मेरी कॉरेलीलिखित ही कादंबरी १८८४ मध्ये युरोपमध्ये पसरलेल्या कॉलरा साथीच्या पार्श्‍वभूमीवरची आहे. या जिवघेण्या साथीच्या काळात विवाहित स्त्रियांमधील व्यभिचाराची बाब सामान्य- अतिसामान्य होत आहे, असे त्या प्रास्ताविकात लिहितात. जेमतेम दोन महिन्यांच्या या काळात संपूर्ण समाजाचे पतन कसे झाले, याविषयी कादंबरीतून भाष्य होते. 

‘‘माझे वय ८४. पायाने अधू. घरात वॉकरशिवाय चालू शकत नाही. अशा परिस्थितीत कदाचित माझ्याकडून अनेकांना त्रासही झाला असेल; पण सर्वांचा हेतू माझ्याकडून लिखाण पूर्ण व्हावे, हाच होता आणि इथून पुढेही असेल.’’
- सुरेश गुप्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com