कळंबा कारागृहातील ९० कैदी देणार पदवी-पदव्युत्तरची परीक्षा

लुमाकांत नलवडे
मंगळवार, 6 मार्च 2018

कोल्हापूर - त्यांनी खुनाचा प्रयत्न केला, खून केला, मारामाऱ्या केल्या, न्यायाधीशांनी त्यांना शिक्षा सुनावली. त्यांना आता पश्‍चात्ताप होतोय. तरीही ‘बी पॉझिटिव्ह’ म्हणून कळंबा मध्यवर्ती कारागृहातील एक-दोन नव्हे, तब्बल ९० कैदी आता शिक्षणाच्या प्रवाहात आहेत.

कोल्हापूर - त्यांनी खुनाचा प्रयत्न केला, खून केला, मारामाऱ्या केल्या, न्यायाधीशांनी त्यांना शिक्षा सुनावली. त्यांना आता पश्‍चात्ताप होतोय. तरीही ‘बी पॉझिटिव्ह’ म्हणून कळंबा मध्यवर्ती कारागृहातील एक-दोन नव्हे, तब्बल ९० कैदी आता शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. पदवी आणि पदव्युत्तरची परीक्षा ते देणार आहेत. कैद्यांचे शैक्षणिक माहेर म्हणूनच ते आता कळंबा मध्यवर्ती कारागृहाकडे पाहत आहेत.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात अंडा बराक आहे. जे समाजाच्या दृष्टीने घातक गुन्हेगार आहेत, त्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे. याच कारागृहात सुतार कामाचा उत्कृष्ट नमुना तयार होतो. टेबल, खुर्च्यांपासून देव्हाऱ्यापर्यंतच्या येथील कलाकुसरीला मागणी आहे. शेतीही याच कैद्यांकडून करून भाजीपाला विक्री केला जातो. अशा एक ना अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या कोल्हापुरातील मध्यवर्ती कळंबा कारागृहाचे काम वेगळेच आहे. येथे कैद्यांनी स्वतःचे रेडिओ चॅनलही सुरू केले. याच कळंबा कारागृहात कैद्यांना शिक्षणाची सोय करून दिली आहे. 

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापाठीच्या माध्यमातून येथील कैदी शिक्षण घेत आहेत. साधारण २००६ मध्ये येथे छोट्या प्रमाणात हा उपक्रम सुरू झाला. पुढे प्रत्येकाला शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आणि पाहता-पाहता आजपर्यंत कारागृहातील तब्बल ११९ कैद्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा तोंडावर आहेत. त्यामुळे कारागृहातील कैद्यांनी अभ्यास वाढविला आहे.

शिक्षणाने मनुष्य शहाणा होतो, त्यामुळे कैद्यांनी शिकावे ही आमचीही इच्छा आहे. त्यासाठी त्यांना ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्व पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. रोजचे त्यांचे काम करून ते इतर वेळेत अभ्यास करतात. पत्रलेखनात एका कैद्याला टपाल विभागाचे बक्षीस मिळाले. शिक्षणामुळे मतपरिवर्तन होऊन त्यांना पुन्हा समाजात सन्मानाने वावरता येईल, असे प्रयत्न आहेत.
- शरद शेळके,
अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह

Web Title: Kolhapur News 90 prisoners will hold post-graduate exam