96 टक्के साखर राज्यात कारखान्यांच्या गोदामातच

निवास चौगले
बुधवार, 7 जून 2017

अपेक्षित दराची प्रतीक्षा - हक्‍काच्या गुजरात, राजस्थान बाजारपेठेत उत्तर प्रदेशचा शिरकाव

अपेक्षित दराची प्रतीक्षा - हक्‍काच्या गुजरात, राजस्थान बाजारपेठेत उत्तर प्रदेशचा शिरकाव
कोल्हापूर - राज्यात या वर्षीच्या साखर हंगामात उत्पादित झालेल्या एकूण साखरेपैकी सुमारे 96 टक्के साखर कारखान्यांच्या गोदामातच आहे. अपेक्षित दराच्या प्रतीक्षेत राज्यातील साखर कारखानदार राहिले, तोपर्यंत महाराष्ट्राची साखर विक्रीची हक्काची बाजारपेठ असलेल्या गुजरात, राजस्थानमध्ये उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांनी साखर विक्री केल्याने राज्यातील साखरेला मागणीच नाही. येत्या चार महिन्यांत साखरेचा उठाव झाला नाही, तर हंगामाच्या सुरवातीला कारखान्यांकडे अपेक्षेपेक्षा जास्त साखरसाठा शिल्लक असणार आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या हंगामात साखरेचे उत्पादन निम्मेच झाले आहे. गेल्यावर्षी सुमारे 86 लाख टन साखर उत्पादन झाले होते. यावर्षी ते 42 लाख टन झाले आहे. हंगामाच्या सुरवातीला देशात 75 लाख टन, तर राज्यात 30 ते 35 लाख टन साखर शिल्लक होती. कमी उत्पादनामुळे साखरेला चांगला दर मिळेल म्हणून हंगामाच्या सुरवातीला कारखानदारांनी साखर विक्रीकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम आज दिसू लागला आहे. आज प्रतिक्विंटल साखरेचा दर 3500 रुपये आहे, पण मागणी नाही.

गुजरात, राजस्थान, पश्‍चिम बंगालबरोबरच ईशान्यकडील राज्ये ही महाराष्ट्राची साखर बाजारपेठ आहेत. मात्र, राज्यातील साखर कारखानदार चांगल्या दराच्या प्रतीक्षेत राहिले. तोपर्यंत उत्तर प्रदेशची साखर महाराष्ट्राची हक्काची बाजारपेठ असलेल्या या राज्यांत पोचली. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील साखरेच्या दरापेक्षा उत्तर प्रदेशसह गुजरातची साखर ही प्रतिकिलो दोन ते अडीच रुपये महाग आहे; पण महाराष्ट्रातील साखरच या राज्यात न गेल्याने उत्तर प्रदेश व गुजरातमधील कारखानदारांनी महाराष्ट्राच्या दरापर्यंत खाली येऊन साखर विकली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेशमध्ये यावर्षी 84 लाख टन साखर उत्पादन झाले होते, यापैकी पन्नास टक्के साखरेची विक्रीही झाली आहे. महाराष्ट्रात मात्र या उलट परिस्थिती आहे.

दरासाठी साखर विक्रीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे राज्यात यावर्षीच्या हंगामातील 96 टक्के साखर गोदामात आहे. काही कारखान्यांकडे गेल्या हंगामातील साखरही विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. काही कारखान्यांनी जुनी साखर विकली व यावर्षीच्या हंगामातील साखर तशीच ठेवली. नव्या हंगामाला अजून चार महिने आहेत, पण या काळात अपेक्षित साखरेची विक्री अशक्‍य आहे. अशा परिस्थितीत हंगामाच्या सुरवातीला देशाच्या पातळीवर महाराष्ट्रातील कारखान्यांकडे सर्वाधिक साखरसाठा शिल्लक राहण्याची शक्‍यता आहे.

आयात साखरेचा अडसर
अगोदरच महाराष्ट्रात 96 टक्के साखर शिल्लक असताना यावर्षी केंद्र सरकारने पाच लाख टन कच्ची साखर आयात केली आहे. या साखरेवर प्रक्रिया करून ती ऑगस्टपर्यंत देशातील बाजारपेठेत विक्री करून संपवण्याचे बंधन आहे. आयात साखरेपैकी महाराष्ट्रात एक किलोही साखर आलेली नाही. त्यामुळे ही साखर महाराष्ट्राची हक्काची बाजारपेठ असलेल्या राज्यांत दाखल होणार आहे, त्याचाही फटका महाराष्ट्राला बसणार आहे.

दृष्टिक्षेपात या वर्षीचे उत्पादन
- देशातील उत्पादन - सुमारे 202 लाख टन
- गेल्या हंगामातील शिल्लक - 75 लाख टन
- महाराष्ट्रातील उत्पादन - 42 लाख टन
- गेल्या हंगामातील शिल्लक - 35 लाख टन

Web Title: kolhapur news 96% suger in factory godown