दारासमोर हवी आमुच्या सुंदर रांगोळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : दिवाळीला जसा फराळ, आकाशकंदील, पणती, फटाके, नवीन कपडे, अत्तर, सेंट, स्प्रे हवेत तशी घरासमोर मन प्रसन्न करणारी रांगोळीही हवी. यंदाच्या दिवाळीत कोल्हापूरच्या मार्केटमध्ये पारंपरिक रांगोळीबरोबर चायना मेड रांगोळीचा मोठा प्रभाव आहे. १० ते २० रुपये किलो असणारी ही रांगोळी हाताळायला सोपी, चमकदार, उठावदार असल्याने ग्राहकांकडून मागणी भरपूर आहे.

कोल्हापूर : दिवाळीला जसा फराळ, आकाशकंदील, पणती, फटाके, नवीन कपडे, अत्तर, सेंट, स्प्रे हवेत तशी घरासमोर मन प्रसन्न करणारी रांगोळीही हवी. यंदाच्या दिवाळीत कोल्हापूरच्या मार्केटमध्ये पारंपरिक रांगोळीबरोबर चायना मेड रांगोळीचा मोठा प्रभाव आहे. १० ते २० रुपये किलो असणारी ही रांगोळी हाताळायला सोपी, चमकदार, उठावदार असल्याने ग्राहकांकडून मागणी भरपूर आहे.

महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिराचा कोपरा, पापाची तिकटी, श्री अंबाबाई मंदिर परिसरात रांगोळी विक्री करणारे व्यापारी आहेत. किलोपेक्षा पाच, दहा रुपयांची छोटी पाकिटे खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेत जास्त आहे. रांगोळीबरोबरच नवीन डिझाईन्सच्या चकत्याही घेतल्या जात आहेत. 

रांगोळीची पद्धती 
महाराष्ट्रात ठिपके काढून ते जोडून रांगोळी काढण्याची प्रथा आहे; परंतु स्वस्तिक, चंद्र, सूर्य, लक्ष्मीची पावले, गोपद्म, महिरप वगैरे आकृती मुक्तहस्त चित्राप्रमाणे काढली जातात. पूर्वी जमिनी शेणाने सारवल्या जात. हिरव्यागार सारवलेल्या जमिनीवर शुभ्र रांगोळीचे रेखाटन, त्यात हळदी-कुंकवाची चिमूट टाकण्याची पद्धत होती. आजही काही खेडेगावांतून ही प्रथा पाळली जाते.

अशी ही रांगोळी 
आपले निवासाचे ठिकाण ही माणसाची मूलभूत गरज. अर्थात, ही गरज पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सौंदर्यीकरणाकडे मनुष्याने लक्ष दिले. आदिमानवानेही गुहा विविध चित्रांनी सुशोभित केलेल्या सापडतात. भारतात घर, अंगणाच्या सजावटीसाठी रांगोळीने विविध आकार रेखाटायची पद्धती विकसित झाली. यामध्ये विविध रंग भरून ती अधिकच देखणी केली जाते. रांगोळीचे प्रकारही वेगवेगळे. गारगोटीचे दगड भाजून त्याची भुकटी केली जाते. या भुकटीची रांगोळी काढली जाते; तर ‘अल्पना’ म्हणजे तांदळाच्या पिठानेही ती काढली जाते. रांगोळ्या, त्यांची विशिष्ट चिन्हे, आकार आदींची सणावारांशी सांगड घातली गेली. उदाहरणार्थ, गौरीचे आगमन झाले की, घरभर तिची पावले काढली जातात. चैत्रात चैत्रांगण, शुभचिन्ह म्हणून स्वस्तिकही काढले जाते. 

रांगोळी आणि कविता 
१८ डिसेंबर १८९६ ला केशवसुतांनी ‘रांगोळी घालताना पाहून’ ही कविता लिहिली. गायीच्या शेणाने सारवलेले सुंदर अंगण, त्या ठिकाणी दोन बहिणी उभ्या असलेल्या कवीला दिसतात. त्यातील एक मुलगी रांगोळी घालू लागते. ती सूर्य, चंद्र, नक्षत्रे, स्वस्तिक, गोपद्म, सुदर्शन चक्र, बेल, फुले, तुळस अशी चित्ताकर्षक रांगोळी काढते. रांगोळी काढताना ती गुणगुणत आहे. उत्तम चित्रे, कविता यांच्यात मिळणार नाही, असे सुंदर मर्म कवीला ती रांगोळी पाहून सापडते. आकाश, जमिनीचा थोडक्‍या जागेत किती मोहक मेळ त्या मुलीने साधला, असे कवी आपल्याला सांगतो. सूर्य म्हणजे दिव्यत्व, स्वस्तिक म्हणजे- धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थांची सफलता तर गोपद्मातून पावित्र्य, चक्रावरून या घरात साक्षात हरी नारायण राहतो, हा संकेत त्या रांगोळीत कवीला सापडतो. कुण्या दुष्टाची वाकडी नजर जर या घरावर पडली, तर रांगोळीमधील सुदर्शन चक्राने घराचे रक्षण होईल, अशी श्रद्धाही आहे.

संस्कार भारती रांगोळ्या
संस्कार भारती संघटनेने महाराष्ट्रात मोठ्या आकृत्या असलेल्या रांगोळ्या काढण्याची नवीन पद्धत सुरू केली. दोर, पेन्सिल अशा वस्तूंच्या मदतीने, स्वस्तिक, गोपद्म, चक्र, शंख, गदा, पद्म, ध्वज आदी प्रतिके एकमेकांना जोडून भव्य रांगोळ्या काढल्या जातात. यामध्ये चाळणीने गाळून रंग भरले जातात. संस्कार भारतीने विकसित केलेल्या या तंत्राच्या सहाय्याने काढलेल्या रांगोळ्या सध्याच्या काळात महाराष्ट्रीय संस्कृतीच्या अविभाज्य भाग झाल्या आहेत. संस्कारभारती रांगोळी कशी काढायची, याचे वर्गही घेतात. ही रांगोळी हॉलंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, ब्रिटन, बेल्जियममध्ये पोचली आहे.

महाराष्ट्रातील चैत्रांगण
भारतीय वर्षाचे जे बारा महिने आहेत. त्या प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व आहे. वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत रोज अंगणात काढलेली वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी म्हणजे चैत्रांगण. संस्कारक्षम अशी ही रांगोळी भारतीय संस्कृतीच्या प्रतीकांमध्ये काढली जाते. मखरात ज्येष्ठा, कनिष्ठा अशा दोन गौरी, दोन्ही बाजूस सूर्य, चंद्र, दोन पंखे, मखराखाली बसायला दोन पाट, त्याखाली शंख, चक्र, गदा, गोपद्म ही पारंपरिक रांगोळी. दोन्ही बाजूला कमळ, स्वस्तिक अशी चैत्रांगणाची रांगोळी सजलेली असते. या चैत्रांगणात कासव, नाग, तुळशी वृंदावन यांनाही स्थान आहे.

Web Title: Kolhapur News Aali Dipawali