अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत राज्यव्यापी संपास सोमवारपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील साधारणपणे पाच हजार अंगणवाड्या बंद ठेवून सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.

जिल्हा परिषदेवर मोर्चा : पाच हजार अंगणवाड्या बंद; मुंबईतील मोर्चास हजारो महिला रवाना

कोल्हापूर - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत राज्यव्यापी संपास सोमवारपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील साधारणपणे पाच हजार अंगणवाड्या बंद ठेवून सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यामुळे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या वेळी महिलांनी सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांमुळे जिल्हा परिषदेचा आवार दणाणून गेला. मंगळवारी (ता. १२) मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी हजारो महिला मुंबईला रवाना झाल्या.

अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, मानधनवाढ समितीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, मिनी अंगणवाडीला पूर्ण अंगणवाडीचा दर्जा द्यावा व त्या ठिकाणी मदतनीसाची नेमणूक करावी, मानधन, प्रवास व बैठक भत्ता, तसेच आहाराचे अनुदान नियमित दर महिन्याला मिळावे, सादीलची रक्‍कम ६ हजार करावी आदी मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर गेल्या.

राज्यव्यापी संपात कोल्हापूर जिल्ह्यातील साधारणपणे पाच हजार अंगणवाड्यांतील महिलांनी अंगणवाड्या बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर हल्लाबोल केला. मोर्चासाठी सकाळपासून कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या महिला महावीर उद्यानामध्ये जमत होत्या. हातामध्ये लाल झेंडे घेऊन दुपारी मोर्चास सुरवात झाली. या वेळी ‘दोन रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता’, ‘कांदा म्हणतो  बटाट्याला, लाज नाही सरकारला’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ आदी घोषणा देण्यात येत होत्या.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हा मोर्चा जिल्हा परिषदेवर आला. मोर्चामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे तास ते दीड तास विस्कळित झाली होती. जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी झाल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. मोहिते यांनी मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने त्यांच्या केबिनमध्ये जात विविध मागण्यांवर चर्चा केली.

निवेदनातील मागण्या अशा

शासनाच्या वतीने वितरित करण्यात येणारे साहित्य अंगणवाडीत पोच करावे किंवा त्याच्या वाहतुकीचा खर्च द्यावा, सेवामुक्‍त झालेल्या सेविका व मदतनिसांना सेवासमाप्तीचा लाभ त्वरित द्यावा, २००८ ते २०१४ दरम्यान सेवामुक्‍त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही सेवासमाप्तीचा लाभ द्यावा, दिवाळीला बोनस द्यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याची एक महिना सुटी मिळावी, राज्य कामगार विमा योजना व भविष्य निर्वाह निधी असंघटित क्षेत्राला लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. अंगणवाडी क्षेत्रालाही तो लागू करावा, आहार शिजविण्यासाठी अनुदानित दराने गॅस सिलिंडर द्यावे, सीडीपीओ, मुख्य सेविका, लिपिक, अंगणवाडी सेविका व मदतनिसांची रिक्‍त पदे भरावीत.

शिष्टमंडळात अतुल दिघे, सुवर्णा तळेकर, छाया तुप्पट, कुसुम पवार, शोभा धुमाळ, संगीता पोवार, भारती पाटील, आशा तावरे, कल्पना तिलारी, सुनंदा कल्लेदार, उषा कांबळे आदींचा समावेश होता. स्थानिक पातळीवरील मागण्यांबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला श्री. मोहिते यांनी दिले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्‍नांबाबत वारंवार सरकारकडे दाद मागूनही सरकार त्याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. त्यामुळे नाइलाजास्तव आम्ही हा संप पुकारला आहे. या संपाची दखल सरकारला घ्यावी लागेल. 
- सुवर्णा तळेकर (अंगणवाडी कर्मचारी संघ)

बेमुदत संपात जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकही अंगणवाडी सुरू नाही. आज (ता. १२) मंत्रालयावर निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी हजारो महिला मुंबईला रवाना झाल्या आहेत. 
- जयश्री पाटील, जिल्हा सेक्रेटरी, अंगणवाडी कर्मचारी युनियन

Web Title: kolhapur news aanganwadi employee on strike