वर्दळीच्या चौकातील एसी स्टडीरूम!

संभाजी गंडमाळे
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - परीख पूल म्हणजे सतत वर्दळीचा चौक. वाहनांचे सायलेन्सर, रेल्वेचा आवाज आणि एकूणच सतत गर्दी अनुभवणारा हा चौक. याच चौकात अगदी परीख पुलाच्या बरोबर समोर वसंतप्रभा चेंबर्समध्ये सत्तरहून अधिक विद्यार्थी अभ्यासात मग्न. पीनड्रॉप सायलेन्स आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास एके अभ्यास असेच चित्र. जिल्ह्यातील अशा पद्धतीचा हा पहिलाच अद्ययावत एसी स्टडी पॉईंटचा प्रकल्प ‘सोनशाल’ या नावाने सुरू झाला आहे आणि त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

कोल्हापूर - परीख पूल म्हणजे सतत वर्दळीचा चौक. वाहनांचे सायलेन्सर, रेल्वेचा आवाज आणि एकूणच सतत गर्दी अनुभवणारा हा चौक. याच चौकात अगदी परीख पुलाच्या बरोबर समोर वसंतप्रभा चेंबर्समध्ये सत्तरहून अधिक विद्यार्थी अभ्यासात मग्न. पीनड्रॉप सायलेन्स आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास एके अभ्यास असेच चित्र. जिल्ह्यातील अशा पद्धतीचा हा पहिलाच अद्ययावत एसी स्टडी पॉईंटचा प्रकल्प ‘सोनशाल’ या नावाने सुरू झाला आहे आणि त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. मात्र या प्रकल्पाची संकल्पना यशस्वी करणाऱ्या विशाल पाटीलची कथा मोठी रंजक आणि तितकीच तरुणाईला प्रेरणादायीही आहे.

विशाल दिगंबर पाटील. रा. बलभीम गल्ली (कसबा बावडा). वडिलांचे फरशी पॉलिशचे मशीन. त्यामुळे शाळेला सुटी पडली की विशाल फरशी पॉलिशचे कामही करायचा. पुढे कॉलेज सुरू झालं. दरम्यान, अकरा वर्षांपूर्वी आईचं निधन झालं. पदवीपर्यंतचे शिक्षण घेताना मग विशालने कधी वॉचमन म्हणून तर कधी हॉटेल कामगार म्हणूनही काम केलं. कारण या दोन्ही नोकरीत अभ्यासाला भरपूर वेळ मिळतो. पुढे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी तो पुण्यालाही गेला. अभ्यासासाठी तो स्टडीरूम्स बघायचा. पण, सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळत नव्हत्या. एक गोष्ट मात्र नक्की होती की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असला तरी त्याच्या मनात बिझनेसमन होण्याचीच सुप्त इच्छा होती.

त्याच इच्छेतून विद्यार्थ्याला एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणारी स्टडीरूम आपणच सुरू केली तर असा विचार मनात आला आणि विशालने कोल्हापूर गाठले. दरम्यान, ‘एमए’च्या पहिल्या वर्षाची परीक्षाही त्याने दिली. खिशात केवळ शंभर रुपये असताना विशालने गाळ्यासाठी एक लाख रुपये डिपॉझिट देण्याची हमीही दिली.

आजवर त्याने मिळवलेल्या माणसांच्या गोतावळ्याने त्याला हा पैसा उभा करून दिला. स्टडीरूमची त्याने केलेली रचनाही अप्रतिम आहे. शंभरहून अधिक विद्यार्थी एकाचवेळी अभ्यास करू शकतील, इतकी या स्टडीरूमची क्षमता आहे. महिन्याला केवळ साडेसातशे रुपयांत प्रत्येकाला येथे स्वतंत्र कंपार्टमेंट, आरामदायी बैठक व्यवस्था, हायस्पीड वायफाय, सर्व वर्तमानपत्रे, मासिक आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके मिळतात. वृत्तपत्र वाचनासाठी स्वतंत्र विभागही येथे आहे. संपूर्ण स्टडी रूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. त्याशिवाय प्रत्येक महिन्याला एक गेस्ट लेक्‍चर सेमीनार, सराव प्रश्‍नपत्रिकांतून परीक्षेची तयारी, अद्ययावत नोटस्‌, ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा, स्वतंत्र लॉकर्स, स्त्री सन्मान समिती ही या स्टडी पॉईंटची वैशिष्ट्ये आहेत.

शिव-शाहू अन्‌ सोनशाल...!
विशालला एकाच ब्रॅंडखाली विविध व्यवसाय सुरू करायचे आहेत. स्टडी रूमबरोबरच त्याने केटरिंगचा व्यवसायही सुरू केला आहे. काही पर्यटन कंपन्यांशी त्याचा टाय-अप आहे. लवकरच तो हॉटेल क्षेत्रात उतरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्मिती केली आणि राजर्षी शाहूंमुळे शिक्षणाची प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांना तो आदर्श मानतो. स्टडी पॉईंटला त्याने सोनशाल असे नाव दिले आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रेरणा देणारी मैत्रीण सोनिया आणि आई शालन यांच्या नावातून हा शब्द आकाराला आला आहे. केटरिंगचा व्यवसाय तो ‘डीपीडी’ या नावाने करतो. ‘दिगंबर पाटील डायनिंग’ असा त्याचा लाँगफॉर्म. अर्थात वडिलांच्या नावाने त्याने हा व्यवसाय सुरू केला आहे.

Web Title: Kolhapur News AC Study room new jobwork