शिरोळचा तलाठी माळी लाच घेताना जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

शिरोळ - सात-बारावर नाव लावण्यासाठी गावचावडीतील तलाठी उमेश लक्ष्मण माळी याला पाच हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

शिरोळ - सात-बारावर नाव लावण्यासाठी गावचावडीतील तलाठी उमेश लक्ष्मण माळी याला पाच हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार भीमराव महादेव चिंचवाडे (रा. कुरुंदवाड) हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांनी मुलाच्या नावे मौजे आगर येथील गट नंबर २८६ मधील प्लॉट खरेदी केला होता. सात-बारावर नाव नोंदणीसाठी खरेदीपत्राची झेरॉक्‍स व अर्ज तलाठी माळी याच्याकडे दिला असता माळी याने नाव लावण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. माळी याने सात हजारावर तडजोड करून हजार रुपये उचल म्हणून स्वीकारून तुमचे काम झाल्यानंतर फोन करतो, असे सांगितले.

तक्रारदार चिंचवाडे यांनी तलाठी माळी याच्याकडे ७/१२ उताऱ्याची मागणी केली. मात्र माळी याने उतारा देण्यास टाळाटाळ केली. यामुळे चिंचवाडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. माळी याने केलेल्या लाच मागणीबाबत पडताळणी केली असता, तडजोडीअंती पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चिंचवाडे यांच्याकडून पाच हजार लाच स्वीकारताना माळी याला पकडले.

ही कारवाई पोलिस उपायुक्त संदीप दिवाण, अपर पोलिस उपायुक्‍त प्रसाद हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गिरीश गोडे, हेडकॉन्स्टेबल श्रीधर सावंत, मनोज खोत, संदीप पावलेकर, कृष्णात पाटील, सर्जेराव पाटील यांनी केली.

Web Title: Kolhapur News ACB arrest Shirol Talathi