कागल - मुरगुड मार्गावर अपघातात दोघे ठार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

सिद्धनेर्ली - गॅस टाक्‍या वाहून नेणारा ट्रक व मोटर सायकल यांची कागल-मुरगुड मार्गावर समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जण ठार तर, तीन जण गंभीर जखमी झाले. दाजीबा सदाशिव पाटील (वय 41) व पांडूरंग दत्तू पाटील (वय 35 दोघेही रा. बामणी) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

सिद्धनेर्ली - गॅस टाक्‍या वाहून नेणारा ट्रक व मोटर सायकल यांची कागल-मुरगुड मार्गावर समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जण ठार तर, तीन जण गंभीर जखमी झाले. दाजीबा सदाशिव पाटील (वय 41) व पांडूरंग दत्तू पाटील (वय 35 दोघेही रा. बामणी) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. रस्त्यातील खड्डा चुकविताना हा अपघात घडला. त्यामुळे कागल- मुरगुड रस्त्याच्या दुरावस्थेबाबत संताप व्यक्त करण्यात येत होता. 

अपघाताबाबत घटना स्थळावरून समजलेली माहिती अशी - गॅस टाक्‍यावाहून नेणारा ट्रक (एम एच 06के 4027) कागलकडून मुरगुडकडे जात होता. तर दाजीबा व पांडूरंग हे गोकुळ शिरगाव एम आय डी सी कडे खासगी कंपनीत कामासाठी दुचाकीवरून (एम एच 09ए वाय 3175) जात होते. अनंत रोटो जवळ नवरत्न धाब्यासमोर सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात झाला. सकाळी दाट धुके होते. रस्त्यातील मोठा खड्डा चुकविण्यासाठी ट्रक उजवीकडे वळला. त्याचवेळी समोर आलेली दुचाकी पाहून ट्रक चालकाने जोरात ब्रेक लावला. मात्र दुचाकीला ट्रकची धडक बसली. अचानक ब्रेक दाबल्याने ट्रकही उलटला. त्यातील गॅसने भरलेल्या टाक्‍या रस्त्यावर पडल्या. पहिल्या धडकलेल्या दुचाकीच्या पाठोपाठ असणारी दुसरी दुचाकी (एम एच 09 1483) ही ट्रक खाली सापडली. प्रसंगावधान साधत दुचाकीस्वार विष्णू आनंदा घराळ (रा. सिद्धनेर्ली) यांनी दुचाकीवरून उडी मारली, मात्र त्यांचा पाय ट्रकमध्ये अडकला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची गाडी ट्रकखाली सापडल्याने गाडीचा चक्काचूर झाला. ट्रकमध्ये बसलेल्या दोन प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत. ते पुण्याहून आले होते. एस. टी. च्या संपामुळे या ट्रकमधून ते गावाकडे चालले होते. तेही या अपघातात जखमी झाले आहेत. 

Web Title: Kolhapur News accident on Kagal Murgud Road