कोल्हापूरात नागाव फाट्याजवळ अपघातामध्ये पाच विद्यार्थी ठार, २५ जखमी

अभिजीत कुलकर्णी
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

नागाव - पन्हाळगडावरुन सांगलीला शिवज्योत घेऊन जाणार्‍या मालवाहतूक टेंपोला अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला. यामध्ये पाचजण जागीच ठार झाले. तर सोळाजण जखमी झाले आहेत.

नागाव - पन्हाळगडावरुन सांगलीला शिवज्योत घेऊन जाणार्‍या मालवाहतूक टेंपोला अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला. यामध्ये पाचजण जागीच ठार झाले. तर सोळाजण जखमी झाले आहेत. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी येथील व्हीआरएल ट्रान्सपोर्ट समोर पहाटे पावणे पाचव्या सुमारास ही दुर्घटना घडली.

सुमित कुलकर्णी  ( वय २० ), अरुण बोंडणे  ( २० ), केतन खोचे  ( २३ ), सुशांत पाटील  ( १८ ) व प्रविण त्रिकोटकर  ( १९ ) अशी मृतांची नावे आहेत. हे  सर्व जण सांगलीच्या वालचंद काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.

जखमींची नावे अशी : आशिष शिंदे, सांगवा शेरपा, प्रणव मुळे, नदीम शेख, ऋषिकेश चव्हाण, वैभव सावंत, तन्मय वडगावकर, दस्तगीर मुजावर, अविनाश रावळ, प्रतिक संकपाळ, हर्ष इंगळे, सुभाष सणगर, सिध्दार्थ कांबळे, आदित्य कोळी, यश रजपूत व अथर्व पाटील

याबाबत मिळालेली माहिती अशी : वालचंद काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पस्तीस विद्यार्थी मालवाहतूक आयशर टेम्पो  ( एमएच १० झेड २७८७ ) मधून व चार विद्यार्थी दोन मोटारसायकलवरून  ( एमएच ०९ ईई ७५७६ ) व  ( एमएच १० बीवाय 7651 ) आणि एक विद्यार्थी ज्योत घेऊन धावत असे चाळीस विद्यार्थी पन्हाळगडावरुन सांगलीला निघाले होते. शिये फाटा येथून ते महामार्गावर आले व शिरोली सांगली फाटा येथून ते सांगलीला जाणार होते. शिरोली एमआयडीसी येथील व्हीआरएल ट्रान्सपोर्ट समोर ज्योतमध्ये तेल घालण्यासाठी दोन मोटारसायकली थांबल्या. त्याच्या मागील बाजूस टेम्पोही थांबला. त्याचवेळी पुण्याहून बेळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने थांबलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. याधडकेमुळे टेम्पो समोर उभारलेल्या मोटारसायकलींवर आदळला व महामार्गावर पलटी झाला. टेम्पोतून अनेक विद्यार्थी महामार्गावर आपटले. शिवाय समोर मोटारसायकलींवर असणारे विद्यार्थी टेम्पोखाली चिरडले गेले. घटनास्थळावरील चित्र विदारक व हृदय पिळवटून टाकणारे होते.

अपघाताची माहिती मिळताच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरिक, नागाव येथील वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश रेळेकर, नितीन कांबळे, सुकुमार कांबळे, विजय बाचणे, सनी बाचणे यांनी तरुणांसह घटनास्थळीधाव घेतली व मदतकार्य सूरू केले. जखमींना उपचारासाठी मिळेल त्या वाहनाने कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. 

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.  पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाला पकडण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: Kolhapur News accident near Nagaon Phata