वाईट झाले.. मुलांचा काय दोष...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

"वाईट झाले.. मुलांचा काय दोष...' अशा शब्दांत अनेकांनी एकमेकांकडे प्रतिक्रिया व्यक्त करत आज सकाळी सर्वजण सीपीआरमध्ये जखमींना मदत करण्यासाठी धावले. जखमींबरोबरच मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्यापासून त्यांना हवी ती मदत करण्यासाठी सीपीआरमध्ये दाखल झाले.

कोल्हापूर - मदत कार्य, धावाधाव, संपर्क यंत्रणा आणि आक्रोश अशी स्थिती आज सकाळपासून सीपीआरमध्ये होती. नागाव फाट्यावरील अपघातातील जखमींवर उपचार, त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क यंत्रणेत पोलिसांसह शासकीय अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू होती. मुलांचे मृतदेह घेण्यासाठी सीपीआरमध्ये आलेल्या शाहूवाडी आणि अंजनीतील नातेवाइकांनी केलेल्या आक्रोशाने अनेकांचे डोळे पाणावले. सकाळी साडेदहापर्यंत अंजनी (सांगली) आणि शाहूवाडीतील तीन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. उर्वरित दोन मुंबईचे असल्यामुळे अद्याप ते सीपीआरमध्येच आहेत. 

पालकमंत्री चंद्रकात पाटील, खासदार धनंजय महाडिक, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपअधीक्षक आर. आर. पाटील, सूरज गुरव, डॉ. प्रशांत अमृतकर, यांसह सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी त्रिभुन कुलकर्णी, मिरज प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार शरद पाटील यांच्यासह कोल्हापूरचे उपमहापौर सुनील पाटील, स्थायी सभापती आशिष ढवळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, बंडा साळोखे, महेश उरसाल यांनी सीपीआरला भेटी दिल्या. 

"वाईट झाले.. मुलांचा काय दोष...' अशा शब्दांत अनेकांनी एकमेकांकडे प्रतिक्रिया व्यक्त करत आज सकाळी सर्वजण सीपीआरमध्ये जखमींना मदत करण्यासाठी धावले. जखमींबरोबरच मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्यापासून त्यांना हवी ती मदत करण्यासाठी सीपीआरमध्ये दाखल झाले. पोलिस अधिकाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यासाठी यंत्रणा हलवली.

शवविच्छेदन विभागाकडेच सर्वांनी गर्दी केली. त्याचशेजारी असलेल्या दूधगंगा व वेदगंगा इमारतीत जखमींना ठेवले होते. अपघात पहाटे झाल्यामुळे सकाळी सातपर्यंत नातेवाईक आणि मित्रमंडळींना माहिती मिळाली. त्यामुळे सीपीआर परिसरात गर्दीच गर्दी झाली.

पोलिस अधिकाऱ्यांपैकी उपअधीक्षक आर. आर. पाटील हे मूळचे अंजनी (तासगाव, जि. सांगली) येथील असल्यामुळे त्यांनी तातडीने यंत्रणा हलविली आणि मृतांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यांच्या परिसरातील दोन्ही मृतदेह सकाळी साडेदहाच्या सुमारास रवाना झाले. 

सीपीआर परिसर गहिवरला 
शाहूवाडीत बरेच दिवस कर्तव्य बजावलेले शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनीही शाहूवाडीतील कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांचा मुलाचा मृतदेह त्यांना तातडीने देण्यासाठी सहकार्य केले. एकुलता एक मुलग्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आक्रोशाने सीपीआर परिसर गहिवरून गेला. तेथे असलेल्यात अनेकांचे डोळे पाणावले. उपअधीक्षक मोहिते आणि गुरव येथे सीपीआरमध्ये थांबून होते. घडलेली सर्व माहिती ते संबंधित अधिकाऱ्यांना वॉलचंद कॉलेजच्या व्यवस्थापनाला, शासकीय अधिकाऱ्यांना देत होते. 

शिवजयंतीचे उत्साहाचे वातावरण असताना घडलेली घटना दुर्दैवी आहे. मृतांच्या नातेवाइकांना मदत देण्यासाठी मी तातडीने मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी जे काय करावे लागेल ते करावे, अशा सूचना दिल्या आहेत. ऑपरेशन थिएटरमध्ये काही कमी असल्यास त्यांनी ते तातडीने उपलब्ध करावे. देणगीदारांनी त्यासाठी पुढे यावे, ज्या जखमींच्या नातेवाइकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करायचे आहे, तेथे त्याचाही खर्च सरकार करेल. 
- चंद्रकांत पाटील,
पालकमंत्री

संबंधीत बातम्या

Web Title: Kolhapur News accident near Nagaon Phata