ट्रॅक्‍टर ट्रॉलीखाली चिरडून दोन शाळकरी मुले ठार

बाळासाहेब कांबळे
बुधवार, 24 जानेवारी 2018

हुपरी - रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे रस्त्याकडेला थांबलेल्या मोटारसायकलवर उसाची ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटून दोन शाळकरी मुले जागीच ठार झाली. यश अनिल शिंगे (वय १५) व साहिल सागर कांबळे (वय १४, दोघेही रा. रेंदाळ) अशी त्यांची नावे आहेत. सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.

हुपरी - रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे रस्त्याकडेला थांबलेल्या मोटारसायकलवर उसाची ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटून दोन शाळकरी मुले जागीच ठार झाली. यश अनिल शिंगे (वय १५) व साहिल सागर कांबळे (वय १४, दोघेही रा. रेंदाळ) अशी त्यांची नावे आहेत. सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.

साहिल व यश दोघेजण मोटारसायकलवर (एमएच ०९ एव्ही ४८३४)  भीमनगर येथील घराशेजारील कॉर्नरलगत बाकड्याजवळ बोलत थांबले होते. रेंदाळमधून ट्रॅक्‍टर (एमएच ०९ सीजे ६०८८) ट्रॉली (एमएच ०९ सीके ५८९० व ५८९१) मधून शिरोळच्या दत्त कारखान्याकडे ऊस भरून निघाला होता. वळणावर चालकाने समोरून भरधाव येणाऱ्या वाहनास चुकवण्याच्या प्रयत्नात ब्रेक दाबला असता मागची ट्रॉली मोटारसायकलवरील यश शिंगे व साहील कांबळे यांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे दोघेही उसाखाली चिरडले गेले. नागरिकांनी ढिगारा बाजूला करीत यश, तसेच साहील यांना बाहेर काढले. १०८ क्रमांकाच्या, तसेच जवाहर साखर कारखान्याच्या ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात येत असताना उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता.

हसती खेळती लेकरं पडद्याआड
यश सहावीत, तर साहील नववीत शिकत होता. यश एकुलता होता. दोन बहिणीनंतर जन्मल्याने यशचे कोडकौतुक होते. घराशेजारीच अपघातात क्रूर नियतीने हिरावून नेल्याने दोघांच्या आईवडील व नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

ट्रॅक्‍टरखाली सापडून एक जण ठार
गारगोटी - शेणगाव (ता. भुदरगड) येथील विठलाई ओढ्यानजीक ट्रॅक्‍टर उलटून एक जण जागीच ठार झाला. संजय नाना राणे (वय ४४, रा. सोनारवाडी) असे मृताचे नाव आहे. अपघाताची पोलिसांत नोंद झाली.  पोलिसांनी सांगितले की, खडी भरून जाणारा ट्रॅक्‍टर (एमएच ०९ सीजे ८१०३) हा  रस्त्याकडेच्या चरीत अर्धवट उलटला. यामध्ये बसलेल्या संजय राणे यांचा ट्रॅक्‍टरखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. पोलिसपाटील विजय साळोखे यांनी पोलिसांत वर्दी दिली.

Web Title: Kolhapur News accident in Rendal two dead