एस.टी. बस - ट्रकची भीषण धडक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

प्रयाग चिखली - एस.टी. बस आणि सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बसचालक जागीच ठार झाला; तर 17 जण जखमी झाले. अर्जुन सदाशिव दुधाणे (वय 45, रा. वरणगे-पाडळी, ता. करवीर) असे चालकाचे नाव आहे. केर्ली (ता. करवीर) जवळ आज दुपारी ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. याबाबतची नोंद करवीर पोलिसांत झाली. 

प्रयाग चिखली - एस.टी. बस आणि सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बसचालक जागीच ठार झाला; तर 17 जण जखमी झाले. अर्जुन सदाशिव दुधाणे (वय 45, रा. वरणगे-पाडळी, ता. करवीर) असे चालकाचे नाव आहे. केर्ली (ता. करवीर) जवळ आज दुपारी ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. याबाबतची नोंद करवीर पोलिसांत झाली. 

जखमींची नावे, वाहक ः मुबारक शमशुद्दीन मोकाशी (वय 54, रा. पन्हाळा), सागर बळवंत पोवार (26, रा. आसुर्ले पोर्ले, पन्हाळा), प्रकाश केरबा शिंदे, पांडुरंग बापू पोवार (65, रा. पडवळवाडी, ता. करवीर), लक्ष्मी कोंडीबा मोहिते (55, रा. सांगरुळ, ता. करवीर), दशरथ केशव मदने (40, रा. देवाळे, ता. पन्हाळा), शरद बापूसाहेब मोळे (25, रा. आसुर्ले-पोर्ले, ता. पन्हाळा), अभिलाषा अशोक कोरे (20, रा. पन्हाळा), बाळकृष्ण महादेव शेटे-पाटील (60, रा. पन्हाळा), मोहन वसंतराव भोसले (68, रा. पन्हाळा), प्रकाश केरबा खैरे (38, रा. मुरगूड, ता. कागल), श्रीराम शंकर साळोखे (68, रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा), दत्तात्रय ज्ञानू वाळुंज (59, रा. केर्ली, ता. करवीर), आरती मोहन भोसले (58, रा. पन्हाळा), संभाजी शिवाजी तडाखे (52, रा. जाफळे, ता. पन्हाळा), मीना संभाजी तडाखे (61, रा. जाफळे, ता. करवीर) अशी आहेत. 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिवाजी पूल आजच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. कोल्हापूर-पन्हाळामार्गे धावणारी एस.टी. बस (एमएच-14-बीटी 0783)वर अर्जुन दुधाणे हे चालक, तर मुबारक मोकाशी हे वाहक म्हणून कर्तव्य बजावत होते. मध्यवर्ती बस स्थानकातून दुधाणे बस घेऊन सुमारे तीनच्या सुमारास बाहेर पडले. बसमध्ये 21 प्रवासी होते. त्यातील काही प्रवासी केर्ली फाट्याजवळ उतरले. दरम्यान, रत्नागिरीहून मोकळे घरगुती सिलिंडर घेऊन कोल्हापूरच्या दिशेने ट्रक (एमएच-10 झेड 5556) येत होता. सव्वातीनच्या सुमारास एस.टी. केर्ली फाट्यापासून 100 मीटरवर गेली असता, समोरून येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, ट्रकची मोडतोड झाली. त्यानंतर एस.टी. बस झाडावर जाऊन आदळली व तिचे नुकसान झाले. या अपघातात बसचालक अर्जुन दुधाणे यांचा मृत्यू झाला, तर 17 प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. 

अपघाताची माहिती समजल्यानंतर करवीर पोलिस उपाधीक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, सहायक पोलिस निरीक्षक आरती नांद्रेकर तातडीने फौजफाटा घेऊन तेथे दाखल झाले. त्यांनी 108 रुग्णवाहिकेतून जखमींना नागरिकांच्या मदतीने सीपीआरला पाठवले. येथील डॉक्‍टरांनी तातडीने जखमींवर उपचार करण्यास सुरवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघाताचे वृत्त समजल्यानंतर सीपीआरमध्ये नातेवाइकांसह नागरिकांनी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. 

108 रुग्णवाहिकेची मोलाची मदत 
अपघातस्थळापासून 17 जखमींना तातडीने 108 रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. वेळेत उपचार झाल्याने जखमींच्या नातेवाइकांनी 108 रुग्णवाहिकेस धन्यवाद दिले. जखमींना तीन रुग्णवाहिकेतून वेळेत सीपीआरमध्ये आणण्याचे काम झोनल व्यवस्थापक डॉ. अरुण मोराळे, जिल्हा व्यवस्थापक संग्राम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अभिजित जाधव, डॉ. रावराणे, डॉ. उमा लकोळे यांनी केले. 

वाहतुकीची कोंडी 
अपघातात चक्काचूर झालेला ट्रक रस्त्याच्या मधोमध एस.टी. बसवर जाऊन आदळल्यामुळे कोल्हापूर-पन्हाळा हा मार्गच वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक कुशिरेमार्गे वळवली. निमुळत्या जागेमधून मोटारसायकलस्वार वाट काढत पुढे जात होते. त्यांची ही कसरत पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली. अपघातानंतर एस.टी. बस झाडावर आदळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

दोन्ही वाहनांच्या केबिनचा चक्काचूर 
अपघात एवढा भीषण होता की, त्यामध्ये ट्रक व एस.टी. बसच्या केबिनचा चक्काचूर झाला. ट्रकची पुढील दोन्ही चाके तर बसचे पुढील चाक तुटून पडले. घटनास्थळी प्रवाशांच्या बॅगा, जेवणाचे डबे, कागदपत्रे आदींचा खच पडला होता. 

चोरीचे प्रकार 
घटनास्थळी जखमी प्रवाशांच्या बॅगा, जेवणाचे डबे, कागदपत्रे, मोबाईल, पैशाचे पाकीट आदींचा खच पडला होता. चोरट्यांनी अशा वस्तूंसह ट्रकमधील लोखंडी जॅकवरही हात साफ करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा हा प्रकार छायाचित्रकारांमुळे पुढे आला. त्यामुळे काही चोरट्यांनी वस्तू जागेवरच टाकून पळ काढला. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर गर्दी पांगली.

Web Title: kolhapur news accident st bus