धुळखात पडलेल्या वाहनांवर इचलकरंजीत होणार कारवाई 

पंडित कोंडेकर
मंगळवार, 23 जानेवारी 2018

इचलकरंजी - शहरात रस्त्यालगत तसेच पालिकेच्या रिकाम्या जागेवर वर्षानुवर्षे बंद पडलेली अनेक वाहने धुळखात पडून आहेत. अशा वाहनांमुळे तेथे अस्वच्छता निर्माण होत असून "स्वच्छ व सुंदर शहर' अभियानला अडथळा होत आहे. अशा वाहनांवर दंडात्मक कारवाईचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. दंड न भरल्यास अशी वाहने जाहीर लिलावाव्दारे विक्री करण्यात येणार आहेत. 

इचलकरंजी - शहरात रस्त्यालगत तसेच पालिकेच्या रिकाम्या जागेवर वर्षानुवर्षे बंद पडलेली अनेक वाहने धुळखात पडून आहेत. अशा वाहनांमुळे तेथे अस्वच्छता निर्माण होत असून "स्वच्छ व सुंदर शहर' अभियानला अडथळा होत आहे. अशा वाहनांवर दंडात्मक कारवाईचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. दंड न भरल्यास अशी वाहने जाहीर लिलावाव्दारे विक्री करण्यात येणार आहेत. 

शहरातील बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला नादुरुस्त झालेली अनेक चारचाकी वाहने धुळखात पडलेली आहेत. याशिवाय पालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवरही पण अशी वाहने वर्षानुवर्षे पडून सडून जात आहेत. शहरात चार चाकी व दुचाकी दुरुस्तीची अनेक गॅरेज आहेत. त्यांच्याकडे अनेक वाहने दुरुस्तीसाठी येतात. त्यातील अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. अनेक दिवस एकाच जागी अशी वाहने थांबून असतात. या वाहनांभोवती कचरा साचून अस्वच्छता निर्माण होत आहे. स्वच्छता करताना अडथळा निर्माण होत आहे. त्याचा शहर सौंदर्यीकरणावर परिणाम होत आहे. 

केवळ अस्वच्छताच नव्हे, तर काही ठिकाणी अशी वाहने वाहतुकीला अडथळा करीत आहेत. पण आतापर्यंत अशा वाहनांवर कोणीच कारवाई केली नाही. ही गंभीर बाब आता पालिका प्रशासनाच्या लक्षात आली आहे. शहरात सध्या स्वच्छतेचा जागर सुरु आहे. या निमित्ताने विषय निदर्शनास आला. 

अशा वाहनांवर पालिका प्रशासनाकडून कारवाईचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये पालिकेकडून संबंधित वाहनांची संबंधित मालकांनी विल्हेवाट लावण्यासाठी जाहीर प्रकटन दिले जाणार आहे. यामध्ये विशिष्ट मुदतीत संबंधित वाहने तेथून न हालविल्यास अशा वाहनांवर पालिकेकडून थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. 

उद्या धोरणात्मक निर्णय 
दंडात्मक कारवाईनंतर त्यांना संबंधित वाहने परत दिली जाणार आहेत. यामध्ये वाहनांचे तीन प्रकारात वर्गिकरण केले आहे. यामध्ये दहा हजार, पाच हजार व दोन हजार अशी दंडात्मक रक्‍कम प्रस्तावित आहे. दंड भरुन वाहन घेऊन न गेल्यास अशा वाहनांचे जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचाही प्रस्ताव आहे. याबाबतचा धोरणात्मक निर्णय गुरुवारी (ता. 25) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेतला जाणार आहे. 

Web Title: Kolhapur News action on dirty unused vehicles near roadside in Ichalkaraji