जयसिंगपुरात अवजड वाहतूकीवर होणार दंडात्मक कारवाई

गणेश शिंदे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

जयसिंगपूर - कोल्हापूर-सांगली महामार्गावरील वाढत्या वाहतूकीबरोबर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच उदगावच्या हद्दीतील रेल्वे ओव्हरब्रीजला अवजड वाहने तटून वाहतूकीची होणारी कोंडी लक्षात घेता उपाययोजना म्हणून अवजड वाहनांना तमदलगे-उदगाव टोलनाका बायपास मार्ग सक्तीचा करण्यात आला आहे.

जयसिंगपूर - कोल्हापूर-सांगली महामार्गावरील वाढत्या वाहतूकीबरोबर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच उदगावच्या हद्दीतील रेल्वे ओव्हरब्रीजला अवजड वाहने तटून वाहतूकीची होणारी कोंडी लक्षात घेता उपाययोजना म्हणून अवजड वाहनांना तमदलगे-उदगाव टोलनाका बायपास मार्ग सक्तीचा करण्यात आला आहे. जयसिंगपूर पोलिसांनी तमदलगे खिंडीत तसा फलकही जयसिंगपूर पोलिसांनी उभारला असून शहरातून जाणाऱ्या अवजड वाहतूकीवर कारवाईची मोहिमही पोलिसांकडून हाती घेतली जाणार आहे. 

पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे वाहतूकीची कोंडी कमी होण्याबरोबर अपघातांच्या प्रमाणातही घट होणार आहे. राज्यातील सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या मार्गांपैकी एक असणारा शिरोली-सांगली महामार्गावर दोन तासाला अठराशे वाहनांची ये-जा होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. सातत्याने वाहतूकीत वाढ होत असताना रस्त्यांच्या अवस्थेत मात्र फारसा फरक पडला नाही. यामुळे मार्गावर अपघात आणि बळींची मालिका थांबताना दिसत नाही. 

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तमदलगे-उदगाव टोल नाका बायपास मार्ग तयार करण्यात आल्यानंतर सांगलीला जाणाऱ्या वाहनधारकांमुळे जयसिंगपूर परिसरातील मार्गांवर कोंडी टळण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात बायपास मार्गावरील गावातील लोकांनी बायपास मार्गाला विरोध केल्याने वाहनधारकांनी जयसिंगपूरमार्गेच प्रवास करणे पसंत केले होते. नंतरच्या काळात ग्रामस्थांचा विरोध मावळला मात्र वाहनधारकांच्या अंगवळणी पडलेला मार्ग बदलणे कठीण झाले आहे. 

गेल्या चार-पाच वर्षात कोल्हापूर-सांगली महामार्ग वाहतूकीस असुरक्षित बनला आहे. सातत्याने अपघातांची मालिका सुरु आहे. तमदलगे-जयसिंगपूर-उदगाव मार्गावरील चौपदरीकरणाचे काम ठप्प असल्याने याच मार्गावर अपघातांचे प्रमाण अधिक आहे. चौपदरीकरणाची सातत्याने मागणी होऊनही शासन पातळीवर याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळे शासनाप्रती वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. जयसिंगपूर शहरात अवजड वाहतूकीमुळे वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. महामार्गावरील नांदणी फाटा, पालिका चौक, क्रांती चौक, झेले चित्रमंदिरजवळ वाहतूकीची कोंडी नित्याची बनली आहे. शिवाय, मार्गावर शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, लोकवस्ती, न्यायालय, व्यापारी संकुले असल्याने वाहतूकीच्या कोंडीचा त्रास सर्वांनाच होत आहे. 

कोल्हापूर-सांगली मूळ महामार्गावर चौंडेश्‍वरी फाटा-केपीटी-उदगाव हा मार्ग अवजड वाहतूकीसाठी राखीव होता. मात्र या मार्गाचा वापर होत नव्हता. अवजड वाहतूक सर्रासपणे जयसिंगपूर शहरातून जात होती. वाहतूकीची कोंडी, वाढत्या अपघातांना आळा घालण्याबरोबर उदगाव हद्दीतील रेल्वे ओव्हरब्रीजला अवजड वाहने तटून होणारी स्थिती लक्षात घेऊन तमदलगे-उदगाव टोलनाका बायपास मार्गावरुन अवजड वाहतून सक्तीची केली जात आहे. तमलदगे येथे पोलिसांनी दिशादर्शक फलक उभारला आहे. जयसिंगपूर, उदगावमार्गे अवजड वाहतूक नेल्यास यापुढे वाहनधारकांना दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

तमदलगे-उदगाव टोलनाकामार्गे अवजड वाहतूक वळवल्याने कोल्हापूर-सांगली महामार्गावरील वाहतूकीची कोंडी कमी होण्याबरोबर अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. तमदगले-उदगाव टोलनाकामार्गेच अवजड वाहतूक झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठीच तमदलगे येथे दिशादर्शक फलक उभारण्यात आला आहे. तरीही अवजड वाहतूक जयसिंगपूरमार्गे नेल्यास वाहनचालकांना दंडशत्मक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.

- दत्तात्रय कदम, 
सहाय्यक पोलिस निरिक्षक, जयसिंगपूर,  पोलिस ठाणे
 

Web Title: Kolhapur News action on heavy transport in Jaysingpur