इचलकरंजीत बनावट गुटखा कारखान्यावर छापा

इचलकरंजीत बनावट गुटखा कारखान्यावर छापा

इचलकरंजी - येथील जुना चंदूर परिसरातील बनावट गुटखा तयार करणारा राजू पाच्छापुरे याच्या कारखान्यावर केंद्रीय अबकारी खाते, अन्न-औषध प्रशासन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल रात्री छापा टाकला. यामध्ये गुटखा तयार करणारी मशिनरी, गुटख्याचे साहित्य, टेम्पो भरून तयार गुटखा असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री उशिरापर्यंत छापासत्र सुरू होते. कारवाईची चाहूल लागताच पाच्छापुरे पसार झाला.

केंद्रीय अबकारी खात्याचे अपर महासंचालक वैशाली पतंगे, अधीक्षक सुनील यादव, रामेश्‍वरबाबा, निरीक्षक दीपक शेरावत, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, पोलिस निरीक्षक सतीश पवार, सहायक पोलिस निरीक्षक संजीव झाडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एस. ए. चौगुले, सहायक आयुक्त एम. एस. केंबळकर, अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. ए. उनवणे, डी. एम. शिर्के, ए. बी. कोळी, आर. पी. पाटील यांनी कारवाईत भाग घेतला. 

महिन्याभरात दुसरी कारवाई
महिन्याभरात केंद्रीय अबकारी खात्याने बनावट गुटखा कारखान्यावर दुसरी कारवाई केली. आरग बेडग येथे सुरू असलेल्या बनावट गुटखा कारखान्यावर छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर आज येथील पाच्छापूरे याच्या बनावट गुटखा कारखान्यावर छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुटख्याची अवैधपणे वाहतूक करणारा टेंपो स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी इचलकरंजी येथे पाठलाग करून पकडला. पण पोलिस पाठलाग करीत असलेले पाहून टेम्पोच्या चालकाने रस्त्यातच टेम्पो सोडून पलायन केले. दरम्‍यान या कारखान्‍याबाबत विश्‍वनाथ लोटे याने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन श्री. मोहिते यांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक युवराज आठरे, उपनिरीक्षक अमोल माळी यांच्या पथकांने जुना चंदूर रोडवरील दुर्गामाता मंदिर परिसरात पाळत ठेवली.

दरम्यान काल दुपारी साडेचारच्या सुमारास पथकाला भरधाव जाणारा टेम्पो दिसला. त्याला थांबविण्याबाबत इशारा करताच टेम्पो न थांबता जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करताच चालकाने टेम्पो दुर्गामाता मंदिरशेजारील रोडवरून शहरात नेण्याचा प्रयत्न केला; पण रोडवर बांधकामाच्या खडीचा ढिगारा असल्याने चालकाने टेम्पो रोडवरच सोडून पलायन केले.

अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त एस. ए. चौगुले, सहायक आयुक्त एम. एस. केंबळकर, अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. ए. उनवणे, डी. एम. शिर्के, ए. बी. कोळी, आर. पी. पाटील आदीचे पथक घटनास्थळी आले. दरम्यान या पथकाला याच परिसरात बनावट गुटखा तयार करणारा कारखाना व गोदाम असल्याची माहिती मिळाली. त्यावरून कारखान्यावर व गोदामावर छापा टाकला. रात्री उशिरा वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर बनावट गुटखा तयार करण्यात येणाऱ्या बंगल्याचे आणि कारखान्याचे कुलूप तोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com