निकृष्ट बियाणे, खत विक्रीबद्दल सव्वातीनशे विक्रेत्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - जिल्ह्यातील बियाणे, खत व कीटकनाशक विक्री केंद्रांच्या तपासणीत निकृष्ट दर्जाची बियाणे, तसेच अप्रमाणित कीटकनाशक व खत विक्री करणाऱ्या साधारणपणे सव्वातीनशे विक्रेत्यांवर कारवाई झाली. यात १७१ केंद्रांना सील करून त्यांना विक्रीला बंदी घातली.

कोल्हापूर - जिल्ह्यातील बियाणे, खत व कीटकनाशक विक्री केंद्रांच्या तपासणीत निकृष्ट दर्जाची बियाणे, तसेच अप्रमाणित कीटकनाशक व खत विक्री करणाऱ्या साधारणपणे सव्वातीनशे विक्रेत्यांवर कारवाई झाली. यात १७१ केंद्रांना सील करून त्यांना विक्रीला बंदी घातली. याशिवाय ६१ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले, तर ४ परवाने निलंबित केले.

शेतासाठी लागणाऱ्या बी-बियाणांची विक्री कृषी सेवा 
केंद्रातून केली जाते. काही वेळा बियाणे निकृष्ट दिली जातात. कृषी विभागातर्फे जिल्ह्यात गुणवत्ता नियंत्रण मोहीम राबविली जाते. जिल्ह्यात १२२४ बियाणे विक्री, १९०७ खत विक्री आणि ८९७ कीटकनाशक विक्रीची केंद्रे आहेत. या केंद्रांची १३ पथकांनी तपासणी करून अहवाल सादर केला. बियाणे विक्रीची ५५८ कृषी सेवा केंद्रे, खत विक्रीची ६५९ व १५३ कीटकनाशक विक्री केंद्रांची तपासणी केली. 

तपासणीत ३२२ विक्री केंद्रे दोषी आढळली. बियाणे खत 
विक्री केंद्रातील २९१ नमुने तपासले. खतांचे २६३ व कीटकनाशकांचे ४७ नमुने तपासले. कारवाई केलेल्या विक्री केंद्र चालकांपैकी एका विक्री केंद्रावर न्यायालयात खटला दाखल केला. ४ विक्री केंद्रांचे परवाने निलंबित केले. मोठ्या प्रमाणात अप्रमाणित बियाणे आढळलेल्या विक्री केंद्रांना सील करून त्यांना विक्रीला बंदी घातली. अशा विक्री केंद्रांची संख्या ४० आहे. खत विक्रेते ३३ आणि ९८ कीटकनाशक विक्री केंद्रांना विक्रीची बंदी घातली. परवाना नूतनीकरणाअभावी ६१ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली.

अप्रमाणित बियाणे किंवा कीटकनाशकांची बेकायदेशीरपणे विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळावे, यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी यापुढेही सुरूच राहील.
- चंद्रकांत सूर्यवंशी, 
   कृषी विकास अधिकारी

Web Title: Kolhapur News action on seed, fertilizer sellers