दोषींवर कारवाई झालीच पाहिजे

दोषींवर कारवाई झालीच पाहिजे

पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे माणगावे; शंका वाटल्यास करा तक्रार 

कोल्हापूर - पेट्रोल पंपावर सुरू असलेली कारवाई ही त्या त्या विभागाची तपासणी आहे. जे दोषी आहेत ते जरूर सापडतील. आम्ही त्याचे कधीच समर्थन करणार नाही. उलट पंपावरचा रोजचा वाद, कारवाई टाळण्यासाठी सर्व पंपचालकांनी पारदर्शी व्यवहार ठेवावेत, अशीच भूमिका असल्याचे पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

माणगावे म्हणाले, ‘‘जरूर काही पंपांवर गैरव्यवहार होत असतील; पण बहुतांशी पंप व्यवस्थित आहेत. रोज पंपावर ग्राहकाशी वाद घालण्यात पंप चालकांना काहीही फायदा नाही. उलट अशा वादग्रस्त पंपावर वाहनचालक पेट्रोल भरण्यास जाण्याचेच टाळतात, असा आमचा अनुभव आहे. 

पेट्रोल वाहनात भरण्यास सुरुवात केली की ते एक, दोन आकड्याऐवजी एकदम पुढचाच आकडा दाखवते, अशी वाहनचालकांची तक्रार असते. पण हा मशीनमधला दोष नाही. 

अशा पद्धतीने टाकीत पेट्रोल सोडल्यास ते कमी भरते अशी वाहनचालकांची समजूत आहे. सुरवातीला एक, दोन, तीन, असे आकडे न दिसता भरभर पेट्रोलचा काटा पुढे पुढे गेला तरी पेट्रोलच्या मापात कमी होत नाही. जर शंका आली तर पंपावर पाच लिटरचा एक सॅंपल कॅन असतो. त्यात पेट्रोल भरून दाखवा,असे ग्राहक सांगू शकतो. पेट्रोल पंप चालकाने ते मान्य न केल्यास ग्राहक सेल्स ऑफिसरकडे तक्रार करू शकतो. या ऑफिसरचा मोबाईल क्रमांक केबीनच्या काचेवर ठळक असतो. आम्ही पेट्रोल पंप असोसिएशनच्यावतीने हा पाच लिटरचा सॅंपल कॅन एक लिटरचा करावा,अशी गेली कित्येक वर्षे मागणी करत आहोत.’’

ते म्हणाले, 'पाच लिटरच्या पेट्रोलमध्ये ३० मिलीलिटरचा फरक होऊ शकतो, तपासणातीत हा फरक दिसतो. पण हा फरक पेट्रोलची धूप, मशीनची देखभाल यामुळे पडू शकतो. पण तोही दुरुस्त करून घ्या असे शेरे तपासणी बुकात अधिकारी मारतात. ज्याला पारदर्शी व्यवहार करायचा आहे ते किरकोळ दुरुस्तीदेखील लगेच करून घेतात. आम्ही असोसिएशनच्यावतीनेही सर्वांना अशाच सूचना देतो. गैरव्यवहार करणाऱ्यांची पाठराखण आम्ही कधीही करत नाही.

ग्राहकांनीही थोडी जागरूकता दाखवून द्यावी. मशीनचा काटा शून्यावर आहे का याची खात्री करून घ्यावी.आम्ही बहुसंख्य पेट्रोल, डिझेल पंपचालक सचोटीनेच व्यवहार करतो. तरीही ग्राहकाला शंका आली तर त्याला समजावून सांगणे हे आमचे कर्तव्यच आहे. आम्ही सांगून समाधान झाले नाही तर पुढे तक्रार करण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. जे कोणी गैरव्यवहार करत असतील ते कारवाईत अडकतील.
- अमोल कोरगावकर, पेट्रोल पंपचालक

वाद घालण्यात अर्थ नाही
पेट्रोल भरताना ते पूर्ण होईपर्यंत पंपावरील कामगाराने खट, खट करत दोन-तीनवेळा बंद करू नये, जेणेकरून ग्राहकांची शंका वाढू नये, अशाही आमच्या सूचना आहेत. कामगार समाधानकारक उत्तर देत नसेल तर स्वतः मालकाने पंपावर थांबून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे, असे आम्ही सांगतो. कारण पंपावर रोज वाद करत बसण्यात पंप चालकांना आनंद नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com