‘गुगल’चा आनंद माझ्यापेक्षा शिक्षकांनाच अधिक - मेहता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

‘गुगल’मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. शिक्षक इंद्रजित यांना माझ्या कर्तृत्वावर विश्‍वास होता. ते मला ‘मोठा’ माणूस होणार असल्याचे सांगत. ‘गुगल’मध्ये मला नोकरी लागल्याचा आनंद माझ्यापेक्षा त्यांनाच अधिक झाला.

-  आदित्य मेहता, गुगल कंपनीचे सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर

कोल्हापूर - ‘गुगल’मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. शिक्षक इंद्रजित यांना माझ्या कर्तृत्वावर विश्‍वास होता. ते मला ‘मोठा’ माणूस होणार असल्याचे सांगत. ‘गुगल’मध्ये मला नोकरी लागल्याचा आनंद माझ्यापेक्षा त्यांनाच अधिक झाला. हा माझ्यासाठी आयुष्यातील मोठा पुरस्कार ठरला, अशी प्रांजळ भावना गुगल कंपनीचे सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आदित्य मेहता यांनी येथे व्यक्‍त केली. प्रोजेक्‍ट द्रोणातर्फे करण गावडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमधील मिनी हॉलमध्ये मुलाखतीचे आयोजन केले होते.  

श्री. मेहता म्हणाले, ‘‘नववीत असतानाच मी माझे चॅलेंज सेट केले होते. तेच माझे शेवटचे चॅलेंज होते. तेव्हापासूनच मी माझ्या भविष्याबाबत सीरियस झालो होतो. दहावीत मी माझ्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्याचवर्षी मला चष्माही लागला. सराव प्रश्‍नपत्रिका सोडविण्यावर भर देत दहावीला नव्वद टक्के गुण मिळवले. अभ्यासासाठी मी एकही क्‍लास लावला नाही. कॉम्प्युटर सायन्स शाखेला प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रमाबाहेरील खूप काही शिकता आले. शिक्षकांची चूक दाखविण्यातही मी कमी पडलो नाही. इतका विश्‍वास माझा माझ्यावर होता. कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतल्यानंतर फर्स्ट सेमची मी पुस्तकेही खरेदी केली नव्हती.’’ 

ते म्हणाले, ‘‘आयुष्यात नापास होण्याची वेळही आली; पण ती एका शिक्षकांची चूक दाखविल्यामुळे. त्या घटनेचा फारसा गवगवा न करता शिकत राहिलो. गुगलसाठी मुलाखतीची विशेष तयारी केली नव्हती. मुलाखतीदरम्यान एखादी समस्या कशी सोडवावी, याची उत्तरे नेमकेपणे दिली. त्याचा नोकरी मिळण्यात फायदा झाला.’’ 

माझे शिक्षक इंद्रजित यांना माझ्यात स्पार्क दिसला होता. ते मला मोठा माणूस होणार असे सांगायचे. त्यांचा शब्द खरा ठरला. नोकरी मिळाल्यानंतर प्रथम त्यांना फोन केला. त्यानंतर कुटुंबीयांना नोकरी मिळाल्याचे सांगितले. ते खूश झाले. मला माझ्या भावासारखे कर्तृत्व सिद्ध करायचे होते, असेही
त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Kolhapur News Aditya Mehta comment