महागाईसह विविध प्रश्‍नांवर इचलकरंजीत सर्व पक्षीय मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

इचलकरंजी - चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव, असा नारा देत महागाई विरोधात आज येथील प्रांत कार्यालयावर सर्व विरोधी पक्षीय कृती समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांसह तब्बल 21 पक्ष व संघटना सहभागी झाल्या होत्या.

इचलकरंजी - चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव, असा नारा देत महागाई विरोधात आज येथील प्रांत कार्यालयावर सर्व विरोधी पक्षीय कृती समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांसह तब्बल 21 पक्ष व संघटना सहभागी झाल्या होत्या. मोदी सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी विरोधकांची एकजुट कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.

मोर्चाचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मदन कारंडे, शिवसेनेचे महादेव गौड आणि माकपचे दत्ता माने यांनी केले. प्रांत कार्यालयासमोर झालेल्या सभेत वक्‍त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणांवर हल्ला केला. 

शिष्टमंडळाने कोणतीही चर्चा न करता प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. अपर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे, तहसिलदार वैशाली राजमाने व पुरवठा निरिक्षक पी. एल. शिंदे उपस्थित होते. 

सुरुवातीला महात्मा गांधी पुतळा परिसरात सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र जमले. त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणा देत मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. प्रवेशव्दाराजवळ पोलिसांनी कडे करुन मोर्चा रोखून धरला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. खासदार शेट्टी, आवाडे, कारंडे, माने, गौड, मिश्रीलाल जाजू, राजेंद्र निकम, प्रताप होगाडे आदींनी मोदी शासनाच्या धोरणांवर हल्लाबोल केला. 

आंदोलकांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी शिंगटे यांना कोणतीही चर्चा न करता निवेदन सादर केले. दरम्यान, या मोर्चाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी शक्ती प्रदर्शन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता. 

प्रमुख मागण्या 

  • वाढत्या महागाईला आळा घाला 
  • पेट्रोल - डिझेल, गॅसवाढ दरवाढ रोखा 
  • यंत्रमाग उद्योगाला सवलतीत वीज द्यावी 
  • केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य द्या 

सहभागी पक्ष व संघटना 
कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, माकप, जनसेवा पार्टी, भाकप, मनसे, सर्व श्रमिक संघ, शेकाप, भारीप - बहुजन महासंघ, जनता दल (सेक्‍युलर), राष्ट्रवादी कामगार संघटना, पिपल्स रिपब्लीकन पार्टी, समता संघर्ष समिती, लाल बावटा कामगार संघटना, म्युनिसिपल वर्कर्स युनियन, आझाद हिंद मंडळ, सोशलिस्ट पार्टी, कोल्हापूर जिल्हा जॉबर संघटना, रिपब्लीकन सेना. 

Web Title: Kolhapur News agitation against Inflation