इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अनोखी स्पर्धा

संजय खूळ 
सोमवार, 28 मे 2018

इचलकरंजी - पेट्रोल व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीच्या निषेधार्थ आज चारचाकी ढकलण्याची अनोखी स्पर्धा झाली. या स्पर्धेस स्पर्धक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

इचलकरंजी - पेट्रोल व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीच्या निषेधार्थ आज चारचाकी ढकलण्याची अनोखी स्पर्धा झाली. या स्पर्धेस स्पर्धक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राहुल आवाडे युवा सेनेच्यावतीने या अनोख्या स्पर्धेचे आयोजन चंदूर (ता. हातकणंगले) येथे करण्यात आले होते.

पेट्रोल आणि डिझेलचे सतत दरवाढ होत आहे. याचा निषेध करण्यासाठी ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. सायंकाळी चंदूर गावातील मुख्य चौकात ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चारचाकी जीप चार जणांच्या गटाने दिडशे मीटरपर्यंत ढकलत नेण्याची ही स्पर्धा होती. दुतर्फा गर्दी आणि ढकलणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांचा जल्लोष अशा वातावरणात स्पर्धा सुरू झाली.

स्पर्धेचे उद्‌घाटन जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, चंदूरचे माजी सरपंच महेश पाटील, बसगोंडा पाटील, जगोंडा पाटील, धुळाप्पा पुजारी, राजू मगदूम आदींच्या उपस्थितीत झाले. जीपगाडी चालविण्यासाठी एकजण व ढकलण्यासाठी चौघेजण सज्ज होते. झेंडा दाखवताच पहिल्या गटाने ही गाडी ढकलण्यास सुरवात केली. दिडशे मीटरपर्यंत काही सेकंदातच स्पर्धकांनी हे अंतर पार केले. सायंकाळी उशिरापर्यंत या स्पर्धा सुरू होत्या.

या स्पर्धेसाठी बक्षिसही अनोख्या पध्दतीने ठेवण्यात आले होते. पहिल्या क्रमांकास 15 लिटर पेट्रोल, दुसऱ्या क्रमांकास 10 लिटर व तिसऱ्या क्रमांकास 5 लिटर पेट्रोल बक्षिस ठेवण्यात आले होते. पेट्रोल आणि डिझेल भाववाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्यावतीने परिसरात अनेक आंदोलने केली जात आहेत. मात्र या अनोख्या स्पर्धेची इचलकरंजी परिसरात जोरदार चर्चा होती.

Web Title: Kolhapur News agitation against in Petrol hike