खंडपीठासाठी पूर्ण ताकदीनिशी आंदोलनात उतरणार - कृती समिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - सर्किट बेंचचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील खासदार-आमदारांची भेट घेऊन ताकदीनशिी व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय खंडपीठ नागरी कृती समितीच्या बैठकीत झाला.

कोल्हापूर - सर्किट बेंचचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील खासदार-आमदारांची भेट घेऊन ताकदीनशिी व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय खंडपीठ नागरी कृती समितीच्या बैठकीत झाला.

खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार अध्यक्षस्थानी होते. सहा जिल्ह्यांतील वकिलांशी चर्चा करून व्यापक परिषद घेऊन सर्किट बेंचप्रश्‍नी आंदोलनाची दिशा ठरवण्यावर समितीचे एकमत झाले. मरगळ आलेल्या आंदोलनाला गती देण्यासाठी वकिलांनी आपापसांतील मतभेद विसरून एकजूट व्हावे, अशी भावनाही सदस्यांनी व्यक्त केली. सर्किट बेंचच्या लढ्यासंदर्भात आज खंडपीठ नागरी कृती समितीची बैठक सायंकाळी जिल्हा बार असोसिएशनच्या सभागृहात झाली. 

निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, ‘‘सहा महिन्यांत आंदोलनाला मरगळ आली आहे. बार असोसिएशनचा अध्यक्ष बदलला, की सर्किट बेंचच्या आंदोलनाची स्थिती बदलते. आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार-आमदारांची भेट घेऊन आंदोलनाची मोट बांधूया. त्याचबरोबर सहा जिल्ह्यांतील वकिलांशी चर्चा करून व्यापक परिषद लवकरच घेऊन व्यापक आंदोलनाची दिशा ठरवूया.’’

निवास साळोखे म्हणाले, ‘‘सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनना एकत्र आणून परिषद घ्यावी. परिषदेला ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांना निमंत्रित करावे.’’ 

दिलीप पवार म्हणाले, ‘‘आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय कोणाचाही सत्कार करू नका. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवानराव काटे 
म्हणाले, ‘‘वकिलांना न्यायालयात जाण्यापासून रोखूया.’’ 

ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, ‘‘सर्किट बेंचबाबत राजकीय पातळीवरही अडवणूक होत आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालावे.’’

अनिल घाटगे म्हणाले, ‘‘आंदोलनास गती देण्यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेऊया.’’

बाबा पार्टे म्हणाले, ‘‘आंदोलन वाटेल तेव्हा सुरू, वाटेल तेव्हा बंद ही पद्धत बंद करा.’’ संभाजी जगदाळे म्हणाले, ‘‘सहा जिल्ह्यांची व्यापक कोअर कमिटी तयार करावी.’’ एस. के. माळी म्हणाले, ‘‘टोल आंदोलनासारखे हे आंदोलन छेडूया.’’ किसन कल्याणकर म्हणाले, ‘‘मतभेद विसरून सर्व वकिलांनी आता एकत्र यावे.’’

जयकुमार शिंदे म्हणाले, ‘‘असोसिएशनच्या आजी-माजी अध्यक्षांनी एकत्र यावे.’’ किशोर घाटगे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांची आतापर्यंत भेटीची तारीख का मिळत नाही यावर चर्चा झाली पाहिजे.’’ प्रसाद जाधव म्हणाले, ‘‘सहा जिल्ह्यांची कोअर कमिटी तयार करा. जिल्ह्याचे पालकमंत्री शहरात आहेत. त्यांच्यासह खासदार, आमदारांचीही ताकद लावूया.

ॲड. बाबा इंदूलकर, दीपाताई पाटील, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अजित मोहिते, माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे, असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिव ॲड. किरण पाटील यांनी आभार मानले. यावेळी व्ही. बी. पाटील, गणी आजरेकर, जहिदा मुजावर, अजित सासने, सुभाष जाधव, लाला गायकवाड, अशोक पोवार, उदय लाड, ॲड. व्ही. आर. पाटील, ॲड. पिटर बारदेस्कर, ॲड. राजेंद्र मंडलिक आदी उपस्थित होते.

सनद पणाला लावू
प्रथम मी शहराचा नागरिक आहे. सर्किट बेंचसाठी नागरिक जर जीव णाला लावत असतील, तर वकिलांचेही काही हात बांधले गेले नाहीत. कोणत्याही परिस्थितीत सर्किट बेंच झाले पाहिजे. त्यासाठी मी सनद पणाला लावण्यास तयार आहे असे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विवेक घाटगे यांनी स्पष्ट केले. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Kolhapur News agitation for Khandpeeth