अजिंक्‍य चव्हाणांच्या नावाने राष्ट्रवादीचा शंखध्वनी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण यांच्या नावाने शंखध्वनी करत त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बुवा चौकातच ताब्यात घेतले.

कोल्हापूर - नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण यांच्या नावाने शंखध्वनी करत त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बुवा चौकातच ताब्यात घेतले. या ठिकाणी झालेल्या भाषणात नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान माजी नगरसेवक अजित राऊत, उत्तम कोराणे यांनी दिले.

दरम्यान, बुवा चौकातून नगरसेवक चव्हाण यांच्या वेताळ तालमीपर्यंत गटागटाने कार्यकर्ते उभा होते. वेताळ तालमीजवळही मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यामुळे वातावरण तणावाचे बनले होते. स्थायी समिती सभापती निवडीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण व अफजल पिरजादे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन सुरू केले आहे.

काल नगरसेवक पिरजादे यांच्या घरावर मोर्चा काढला होता. आज नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण यांच्या वेताळ तालमीजवळ असणाऱ्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचे आयोजन केले होते. मोर्चासाठी उभा मारुती चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सकाळपासून जमत होते. याचवेळी श्री. चव्हाण यांचेही समर्थक बुवा चौकातून वेताळ तालमीपर्यंत गटागटाने रस्त्यावर उभे होते.

मोर्चा सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी बुवा चौकातील कार्यकर्त्यांना बळाचा वापर करत मागे हटविले. उभा मारुती चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. "पैशाला मत विकणाऱ्या अजिंक्‍य चव्हाणचा धिक्कार असो', "गली गली मे शोर है, अजिंक्‍य चव्हाण चोर है',अशा घोषणा देत मोर्चा बुवा चौकापर्यंत आला. या ठिकाणी मोर्चा अडविण्यात आला. मोर्चा बुवा चौकात आल्यानंतर सरदार तालमीकडून माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे पुढे सरकू लागले. तेंव्हा त्यांना पोलिसांना अडविले. शिवाजी पेठेच्या परंपरेला गालबोट लावू नका, असे त्यांना सांगितले. मोर्चा अडविल्यानंतर या ठिकाणी भाषणे झाली. 

माजी नगरसेवक अजित राऊत म्हणाले, राऊत आणि कोराणे परिवाराच्या जोरावर अजिंक्‍य निवडून आला. बुजुर्ग माणसांचा शब्द पाळण्याची परंपरा शिवाजी पेठेत आहे त्यानुसार आम्ही शब्द पाळला. पैसे घेऊन फुटायचे हे शिवाजी पेठेच्या रक्तात नाही. ज्यांच्यासाठी आम्ही मते मागितली त्यानेच आम्हाला रस्त्यावर आणले.माजी महापौर सुनिता राऊत यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मते मागितली. अजिंक्‍यमध्ये एवढीच धमक असेल त्याने राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे. रामभाऊ चव्हाण यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही माघार घेतली पण पाठीत खंजीर खुपसला जाऊ शकतो याची जाणीव त्यावेळी नव्हती. दीड कोटी रूपये त्याला किती दिवस पुरतात तेच आम्ही बघतो. 

उत्तम कोराणे म्हणाले, गल्लीतील एक मुलगा अजिंक्‍यला ओळखत नसताना त्याला निवडून दिले. सहा महिन्यानंतर पद देण्याचे आश्‍वासन नेत्यांनी दिले होते. पैशाच्या मोहापोटी निष्ठा विकण्याचे काम संबंधित नगरसेवकांनी केले आहे. आमच्या जोरावर निवडून आला आणि आमच्याशीच गद्दारी केली. अजिंक्‍यमध्ये इतकीच हिंमत असेल तर त्याने राजीनामा द्यावा आणि शंभर मते घेऊन दाखवावीत. 

आर. के. पोवार म्हणाले, अजिंक्‍य चव्हाण यास ज्येष्ठ कार्यकर्ता या नात्याने आवाहन आहे की त्याने तातडीने राजीनामा द्यावा. 
राजू लाटकर म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ यांनी महापौरांसह उपमहापौर अशी मानाची पदे पेठेत दिली. आयआरबी कंपनीच्या विरोधात ज्या सुनिता राऊत चप्पल घेऊन रस्त्यावर उतरल्या त्याच प्रभागातील अजिंक्‍य चव्हाण याने पक्षाशी गद्दारी केली. 
दरम्यान, अजिंक्‍य चव्हाण आपल्या समर्थकांसह वेताळ तालमीजवळ थांबले होते. या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. नगरसेवक चव्हाण यांच्यासोबत नूतन स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक अफजल पिरजादे, कमलाकर भोपळे, किरण नकाते आदी होते. 
 
हिंमत असेल राजीनामा द्या 
राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या अजिंक्‍य चव्हाण याने प्रथम नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरून शंभर मते मिळवून दाखवावी,असे आव्हान उत्तम कोराणे यांनी दिले. 

पाठित खंजीर खुपसला 
बुजुर्ग माणसांचा शब्द पाळण्याची परंपरा शिवाजी पेठेची आहे. पैशासाठी फुटणे शिवाजी पेठेच्या रक्तात नाही. राजकारणात शब्द आणि विश्‍वासार्हता महत्वाची असते. रामभाऊ चव्हाण यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही माघार घेतली, पण पाठीत खंजीर खुपसला जाऊ शकतो याची जाणीव त्यावेळी नव्हती. दीड कोटी रूपये त्याला किती दिवस पुरतात तेच आम्ही बघतो, असे अजित राऊत यांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News agitation of NCP against Ajinkya Chavan