ठिबकच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्यावर राज्यसरकारचा भर - मंत्री चंद्रकांत पाटील

राजकुमार चाैगुले
रविवार, 4 मार्च 2018

कोल्हापूर - जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावागावात शाश्वत पाणीसाठे करण्याबरोबरच शेतीमध्ये ठिबक सिंचनाचा प्रभावी अवलंब करुन शेती उत्पादन वाढविण्याची राज्य शासनाची भुमिका आहे. केवळ निधी न देता वेगवेगळ्या कल्पनांना यापुढे शासनातर्फे वाव देवून शेतीच्या सुधारणेसाठी सर्वांगिण प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता. 4) येथे केली. 

कोल्हापूर - जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावागावात शाश्वत पाणीसाठे करण्याबरोबरच शेतीमध्ये ठिबक सिंचनाचा प्रभावी अवलंब करुन शेती उत्पादन वाढविण्याची राज्य शासनाची भुमिका आहे. केवळ निधी न देता वेगवेगळ्या कल्पनांना यापुढे शासनातर्फे वाव देवून शेतीच्या सुधारणेसाठी सर्वांगिण प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता. 4) येथे केली. 

कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प यांच्यावतीने येथील मेरी वेदर मैदानावर आयोजित कृषी महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सात मार्चअखेर हा महोत्सव चालणार आहे. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री पाटील म्हणाले, शेती उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना उपलब्ध करुन देण्यासाठी ठिबकचा कोठा शासनाने वाढविला असून ठिबकसाठी शेतकऱ्यांना सरसकट अनुदान उपलब्ध व्हावे यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे केला जाईल. जिल्ह्यातील अधिकाधिक शेती ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी कृषि विभाग तसेच अन्य सेवाभावी संस्थांच्यावतीने ठिबक सिंचनाचा भरीव कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेतला जाईल. यामध्ये 40 ते 50 शेतकऱ्यांनी एकत्र येवून किमान 150 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा एकत्रित प्रकल्प हाती घेतल्यास शेती उत्पन्न वाढण्याबरोबरच उत्पादित शेती मालाला बाजार पेठाही उपलब्ध होतील. यादृष्टीने ठिबक सिंचनाची तसेच शेतीमध्ये शेडनेटची नवी योजना राबविण्यावर अधिक भर दिला जाईल. 

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाबार्डच्या माध्यमातून 2600 कोटीची ठिबक सिंचन अनुदान योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे.

-  सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षात शेती औजारे खुल्या बाजारातून घेण्यासाठी अनुदान योजना प्रभावीपणे राबविली असून ठिबक सिंचनासाठी यंदा राज्याला 700 कोटी रुपये उपलब्ध होत असून ठिबक सिंचनाची ऑनलाईन प्रक्रिया वर्षभर शेतकऱ्यांसाठी सुरु ठेवली जाईल, असे श्री खोत यांनी यांनी यावेळी सांगितले. 

उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सुरेश पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी विविध पिक स्पर्धेत यश मिळविलेल्या शेतकऱ्यांचा व माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी स्वागत केले. कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार- फरांदे यांनी सुत्रसंचालन केले. 

Web Title: Kolhapur News Agricultural festival